अश्विनी पोनप्पाच्या साथीने कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पध्रेचे विजेतेपद पटकावणाऱ्या ज्वाला गट्टाने केंद्र सरकारला कडवे बोल सुनावले आहेत. पुढील वर्षी रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या ईष्रेने तयारी करणाऱ्या आम्हा दुहेरी विशेषज्ञ खेळाडूंना सरकारने मदतीचा द्यावा, असे आवाहन ज्वालाने यावेळी केले.
‘‘आघाडीच्या खेळाडूंना आवश्यक असणारे साहाय्य आम्हाला हवे आहे. एकेरीतील खेळाडूंना दिली जाणारी मदत आम्हालासुद्धा देण्यात यावी. मी आणि अश्विनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू, असा मला विश्वास वाटतो. आता तरी किमान ही जाग आल्यास मला अत्यंत आनंद होईल,’’ असे ज्वाला म्हणाली.
‘‘मला काय करावे हे खरेच कळत नाही. ते आता तरी विचार करू लागले आहेत. एक खेळाडू म्हणून मी फक्त माझ्या खेळाचा गांभीर्याने विचार करणे स्वाभाविक आहे. मला ऑलिम्पिक पदकाच्या दृष्टीने प्रशिक्षण आणि सरावाची आवश्यकता आहे. यातून मी विकसित होईन आणि माझ्यातील उणिवा दूर करू शकेन,’’ असे ज्वालाने सांगितले.
‘‘योग्य मदत मिळाल्यास ऑलिम्पिकमध्ये दुहेरीतील पदकाची आम्हाला खात्री आहे. किमान कॅनडातील विजेतेपदाने तरी नागरिकांना आणि क्रीडा मंत्रालयाला याची जाणीव होईल आणि आम्हाला आवश्यक असलेले साहाय्य मिळेल,’’ असा आशावाद ज्वालाने प्रकट केला.
सरकारी मदतीचे महत्त्व विशद करताना ३१ वर्षीय ज्वाला म्हणाली, ‘‘एकेरीतील खेळाडूंसह अनेक जणांना सरकारी मदतीमुळे कामगिरी दाखवण्याचे बळ मिळते. जर सरकारने निधी दिला नाही, तर अनेक खेळाडू अपयशी ठरतील. आम्ही सरकारवर अवलंबून असतो. ‘टॉप’ या योजनेमुळे आम्हाला नक्की फायदा होत आहे.’’

Story img Loader