मार्गात येणारे अडथळे खेळाडूला परिपक्व बनवत जातात. हे अडथळेच खेळाडूकडून चांगली कामगिरी घडवून आणण्यास कारणीभूत असतात. मार्गात येणाऱ्या अडथळ्यांचा नुसता विचार जरी मनात आला तरी त्या खेळाडूला चांगली कामगिरी करण्याचे स्फुरण चढते. त्यानंतर त्याच्याकडून रेखाटली जाते ती सुंदर कलाकृती. नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसननेही मार्गात येणारे अडथळे सहजपणे पार करत २२व्या वर्षी बुद्धिबळातील एव्हरेस्ट शिखर गाठले. कार्लसनने विश्वनाथन आनंदच्या साम्राज्याला शह दिल्यानंतर आता बुद्धिबळातील युगांतराला सुरुवात झाली आहे.
आनंद हा ९०व्या दशकातील गॅरी कास्पारोव्ह युगाचा साक्षीदार होता. कास्पारोव्हच्या युगात आनंद १९९१मध्ये पहिल्यांदा जेव्हा जागतिक क्रमवारीत अव्वल १० जणांमध्ये पोहोचला, त्या वेळी कार्लसन अवघ्या आठ महिन्यांचा होता. म्हणूनच अनुभवाचा खजिना असलेला विश्वनाथन आनंद आणि अफाट ऊर्जा, बुद्धिमत्ता असलेला मॅग्नस कार्लसन यांच्यातील विश्वविजेतेपदाची ही लढत दोन पिढय़ांच्या खेळातील शैलीचा विरोधाभास दर्शवणारी होती. आनंदने तासन्तास बसून योग्य आणि अचूक अभ्यास तसेच क्लासिक बुद्धिबळाचे धडे गिरवले. मात्र कार्लसनला आपल्या काळात थेट बुद्धिबळाच्या सॉफ्टवेअरद्वारे अभ्यास करता आला. जुन्या काळात आपल्या मोहऱ्यांचा बळी देऊन त्यागाची भूमिका घेण्याची हिंमत कुणामध्येही नव्हती. पण आताच्या युगात बेधडकपणा आणि नाटय़ अनुभवण्याची हिंमत बुद्धिबळपटू दाखवू लागले आहेत. बुद्धिबळाचा अभ्यास करणे खडतर असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर आक्रमक पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या लढती त्या काळी अभावानेच पाहायला मिळायच्या. १९५६मध्ये डोनाल्ड ब्रायन आणि १३ वर्षांच्या बॉबी फिशर यांच्यात रंगलेला सामना हा शतकातील सर्वोत्तम सामना म्हणून गणला जातो. फिशर यांनी १७व्या चालीला आपल्या वजिराचा बळी देऊन २४व्या चालीला अनपेक्षित असा विजय मिळवला होता. त्या वेळी बुद्धिबळातील विश्वविजेते आपल्या प्रतिस्पध्र्यावर हळूहळू कुरघोडी करून डाव मजबूत स्थितीत आणल्यानंतर त्यावर हल्ला चढवायचे आणि प्रतिस्पध्र्याला माघार घ्यायला भाग पाडायचे, हे आतापर्यंतचे चित्र. पण कार्लसनसारख्या अफाट बुद्धिमत्ता असलेल्या खेळाडूने हे चित्र बदलून टाकले आहे. आता जगज्जेतेपदाची मशाल एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आली आहे. बुद्धिबळातील नव्या आधुनिक युगाची ही नांदी म्हणता येईल.
विश्वविजेतेपदाच्या लढतीआधी बरेचसे खेळाडू कित्येक महिन्यांपासून बुद्धिबळासंदर्भातील कार्यक्रम, खडतर सरावाला सामोरे जातात, पण कार्लसन त्या पठडीतला नाही. फारसा गृहपाठ न करता थेट पटावर येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जायचे, ही त्याची वृत्ती. डावाच्या सुरुवातीवर लक्ष केंद्रित करणाऱ्यांपैकीही कार्लसन नाही. मात्र सुरुवातीलाच आपल्यावर वाईट परिस्थिती उद्भवू नये, याची काळजी तो घेत असतो. कोणत्याही परिस्थितीत डाव जिंकण्याची क्षमता त्याच्यात आहे. शांतचित्ताने खेळत राहणे, हीच त्याच्या महानतेची ओळख आहे. एकाच वेळी हजारपेक्षा जास्त डाव आठवण्याची आणि एकाच वेळी १०पेक्षा बलाढय़ प्रतिस्पध्र्याना नमवण्याची ताकद त्याच्यात आहे.
कार्लसनने गेल्या दोन-तीन वर्षांत ज्या प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये भाग घेतला, त्यात स्वत:च्या कर्तृत्वाची, गुणवत्तेची मोहोर उमटवली. गेल्या नऊपैकी सहा स्पर्धा त्याने जिंकल्या. त्याउलट २००८मध्ये आनंदच्या जेतेपदांचा दुष्काळ सुरू झाला. पण सुदैवाने त्याला त्यानंतर तीन जगज्जेतेपदे कायम राखता आली. आनंदची फिडे क्रमवारीतही आठव्या क्रमांकावर घसरण झाली. त्याउलट कार्लसनने आतापर्यंत कुणालाही गाठता न आलेल्या २८७० रेटिंग गुणांचा विक्रम आपल्या नावावर केला.
आपल्या अफाट बुद्धिमत्तेद्वारे कल्पक चाली करून प्रतिस्पध्र्याला चुका करण्यासाठी बुचकळ्यात टाकायचे. संगणकाप्रमाणे संथ, शांतचित्ताने चाली करून प्रतिस्पध्र्यावर मात करायची. विश्वविजेत्यावर प्रभूत्व कसे गाजवायचे, हे कार्लसनला चांगलेच ठाऊक होते. कार्लसनने एका मुलाखतीत म्हटले होते की, विश्वविजेतेपदाच्या लढतीआधी मी जवळपास प्रत्येक डावात चूका केल्या. पण त्या चुकांचा फायदा उठवण्याइतपत एकही प्रतिस्पर्धी सक्षम नव्हता.
कार्लसनने विश्वविजेतेपदाच्या लढतीतील दहा डावांत एकदाही मोठी चूक केली नाही, हेच त्याच्या खेळाचे वैशिष्टय़ म्हणता येईल. तो भलेही संकटात सापडला असेल, पण शिस्तबद्ध चाली करत आनंदचे आक्रमण थोपवण्याचे जादुई तंत्र त्याच्याकडे नक्कीच होते. आनंद जिंकण्याच्या स्थितीत असतानाही त्याला रोखायचे कसे, याचा संपूर्ण अभ्यास कार्लसनने केला होता. त्याउलट अनेक वेळा बरोबरीची संधी असतानाही आनंदला योग्य तोडगा काढण्यात अपयश आले. कार्लसनच्या दबावाखाली त्याला प्रतिकार करता आला नाही. नवव्या डावात चांगल्या स्थितीत असतानाही २८व्या चालीला आनंदने केलेली घोडचूक म्हणजे त्याचा पराभव अटळ, हेच सांगणारी होती. प्रत्येक डाव बरोबरीत सोडवण्याची संधी आनंदकडे होती. पण शेवटच्या क्षणी केलेल्या चूकांमुळे कार्लसनला तीन डाव जिंकून विश्वविजेतेपदावर नाव कोरता आले.
जगातील सर्वोत्तम बलाढय़ खेळाडू म्हणून कार्लसनची ख्याती आहे. आपल्या खेळाचा मनमुराद आनंद लुटणारा कार्लसन आता अनेक वर्षे बुद्धिबळावर राज्य करेल, असे बुद्धिबळपंडितांचे म्हणणे आहे. विश्वविजेतेपदाच्या लढतीत कास्पारोव्हकडून मात खाल्ल्यानंतर आनंदला कास्पारोव्हवर एकही विजय मिळवता आला नव्हता. गॅरी कास्पारोव्हने आपल्या काळात सर्व प्रतिस्पध्र्यावर अधिराज्य गाजवले. तसेच कार्लसनच्या बाबतीत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. येणारी पिढी कार्लसनचा कित्ता नक्कीच गिरवतील. काहींना यात नक्कीच यश येईल. ही कार्लसन युगाची सुरुवात आहे.
युगांतर
मार्गात येणारे अडथळे खेळाडूला परिपक्व बनवत जातात. हे अडथळेच खेळाडूकडून चांगली कामगिरी घडवून आणण्यास कारणीभूत असतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-11-2013 at 04:54 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After draw in game 10 carlsen is crowned world champion