Cheteshwar Pujara and Suryakumar Yadav decided to play in the Duleep Trophy: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी १६ सदस्यीय भारतीय कसोटी संघ बीसीसीआयने शुक्रवारी जाहीर केला. या संघातून चेतेश्वर पुजारा वगळून त्याच्या जागी युवा खेळाडूला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघाता अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार आहे.
त्याचा पश्चिम विभागाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्यासोबत सूर्यकुमार यादवही पश्चिम विभागाकडून दुलीप ट्रॉफी खेळणार आहे. चेतेश्वर पुजारा आणि सूर्यकुमार यादवच्या जागी दोन युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या दोघांच्या जागी ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वालला संधी मिळाली आहे.
२८ जूनपासून दुलीप ट्रॉफीला होणार सुरुवात –
दुलीप ट्रॉफी २८ जूनपासून सुरू होणार असून १६ जुलैपर्यंत चालणार आहे. ही स्पर्धा बंगळुरू येथे खेळवली जाईल आणि पश्चिम विभागाव्यतिरिक्त दक्षिण, मध्य, पूर्व, उत्तर आणि उत्तर-पूर्व विभागातील संघ सहभागी होतील. प्लेऑफ-१ मध्य आणि पूर्व विभागांमध्ये आणि प्लेऑफ-२ उत्तर आणि उत्तर-पूर्व विभागांमध्ये खेळला जाईल. गत हंगामातील अंतिम फेरीतील दक्षिण आणि पश्चिम विभाग ५ जुलैपासून थेट उपांत्य फेरीत खेळतील. फायनल १२ जुलै रोजी होणार आहे.
पुजारा सात वर्षांनंतर दुलीप ट्रॉफी खेळताना दिसणार –
भारतीय संघातून वगळल्यानंतर चेतेश्वर पुजाराने दुलीप ट्रॉफी खेळणार आहे. पुजारा २०१६ मध्ये दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया बी संघाकडून शेवटचा खेळला होता. तेव्हापासून तो बहुतांश वेळ टीम इंडियासोबत कसोटी खेळण्यात व्यस्त होता. त्याने १३ दुलीप ट्रॉफी सामन्यात ९०६ धावा केल्या आहेत.
पुजारा-सूर्यकुमार जास्तीत जास्त दोन सामने खेळतील –
चेतेश्वर पुजारा आणि सूर्यकुमार यादव यांचा पश्चिम विभागाच्या संघात समावेश आहे. दोन्ही खेळाडू ५ जुलै रोजी पश्चिम विभागाच्या उपांत्य फेरीत खेळताना दिसतील. जर संघ जिंकला आणि अंतिम फेरीत पोहोचला तर दोन्ही खेळाडू जास्तीत जास्त दोन सामने खेळू शकतील. दुलीप ट्रॉफीनंतर पुजारा इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. तर सूर्यकुमार यादव वेस्ट इंडिजला रवाना होईल, जिथे तो वनडे संघासोबत असेल.
१२ जुलैपासून वेस्ट इंडिजचा दौरा सुरू होणार –
वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात १२ जुलैपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. २७ जुलैपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. सूर्यकुमारचा भारताच्या एकदिवसीय संघात समावेश आहे, दुलीप ट्रॉफी फायनल १६ जुलैपर्यंत खेळवली जाणार आहे. अशा स्थितीत सूर्याला वेस्ट इंडिज गाठण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. टीम इंडिया एकदिवसीय सामन्यांनंतर वेस्ट इंडिजमध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिका देखील खेळणार आहे, ज्याचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र आयसीसी टी-२० क्रमवारीतील नंबर-१ फलंदाज सूर्यकुमारचाही या संघात समावेश नक्कीच होईल.