भारतीय संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा ८ गडी राखून दारुन पराभव केला. यानंतर पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक केले आहे. रायपूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने अगोदर न्यूझीलंडला १०८ धावांत गुंडाळले. त्यानंतर २०.१ षटकांत २ गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले. अशाप्रकारे भारताने सलग दुसरा सामना जिंकून वनडे मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

२०१९ च्या विश्वचषकानंतर टीम इंडियाने घरच्या मैदानावर १९ पैकी १५ वनडे सामने जिंकले आहेत. न्यूझीलंड व्यतिरिक्त भारताने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघांविरुद्ध मायदेशात वनडे मालिका जिंकल्या आहेत. घरच्या मैदानावर मालिका जिंकण्याच्या भारतीय संघाच्या शैलीने रमीझ राजा प्रभावित झाले आहे. इतर संघांनीही या बाबतीत भारताकडून शिकले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

रमीझ राजा आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाले, “भारताला भारतात हरवणे कठीण आहे. पाकिस्तानसह उपखंडातील इतर संघांसाठीही ही शिकण्याची बाब आहे. पाकिस्तानकडे पुरेशी क्षमता आहे पण निकाल किंवा मालिका विजयाच्या बाबतीत त्यांची घरची कामगिरी टीम इंडिया इतकी सातत्यपूर्ण नाही. विश्वचषक स्पर्धेतील भारतासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.” या वर्षी वनडे विश्वचषक भारतात होणार आहे. भारताने सलग दोन वनडे मालिका जिंकून वर्षाची सुरुवात शानदार केली आहे.

हेही वाचा – IND vs NZ 2nd ODI: रोहित शर्माचे स्वत:च्या खेळीबद्दल मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘मी गोलंदाजांवर…’

विशेष म्हणजे, अलीकडेच न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पाकिस्तानला १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी किवी संघाविरुद्धची कसोटी मालिका अनिर्णित राहिली. याआधी पाकिस्तानला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडकडने क्लीन स्वीप केले होते.

Story img Loader