Yashasvi Jaiswal thanked Hardik Pandya and the support staff : भारताने चौथ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा ९ विकेट्सने पराभव केला. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. आता रविवारी निर्णायक सामना होणार आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजने दिलेले लक्ष्य १७ षटकांत केवळ १ गडी गमावून पूर्ण केले. भारताकडून सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी चमकदार कामगिरी केली. यशस्वी जैस्वालने सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या आणि सपोर्ट स्टाफचे आभार मानले. यासोबतच त्याने सामन्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली.
चौथ्या सामन्यातील नाबाद खेळीनंतर यशस्वी जैस्वाल म्हणाला, “हे माझ्यासाठी सोपे नव्हते. मी मैदानावर गेलो आणि माझ्या हिशोबाने खेळलो याचा मला आनंद आहे. मी सपोर्ट स्टाफ आणि हार्दिक भाई (कर्णधार हार्दिक पंड्या) यांचे आभार मानू इच्छितो. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, हे मला खूप प्रभावित करते. मी संघाच्या गरजेनुसार खेळतो आणि झटपट धावा काढण्याचा प्रयत्न करत होतो.”
आपल्या खेळीबद्दल बोलताना यशस्वी जैस्वाल म्हणाला, “मी पॉवरप्लेमध्ये खेळण्यास सक्षम आहे, मी संघाला चांगल्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. सामन्यादरम्यान परिस्थितीनुसार खेळणे खूप महत्त्वाचे असते. मी धावा करण्याचा प्रयत्न करत होतो. आयपीएलमध्ये मी जेसन होल्डर आणि मॅककॉय यांचा खूप सामना केला आहे. यामुळे मला खूप मदत झाली आहे.”
हेही वाचा – IND vs WI 4th T20 : यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलने रचला इतिहास, बाबर-रिझवान जोडीला टाकले मागे
वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात यशस्वी आणि गिलने बॅटने जोरदार फटकेबाजी केली. या दोन्ही फलंदाजांनी लॉडरहिलमधील सर्व कॅरेबियन गोलंदाजांचा जोरदार समाचार घेतला. दरम्यान, यशस्वी जैस्वालने ५१ चेंडूंत ११ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ८४ धावा केल्या. त्याचबरोबर शुबमन गिलने ४७ चेंडूचा सामना करताना ३ चौकार आणि ४ षटकार मारत ७७ धावा केल्या. यादरम्यान दोन्ही फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी १५.३ षटकात १६५ धावांची शतकी भागीदारी झाली.
भारताने १८ चेंडू आणि ९ गडी राखून जिंकला चौथा सामना –
लॉडरहिल येथे खेळला गेलेला चौथा टी-२० सामना भारतीय संघासाठी ‘करो या मरो’ असा होता. पण टीम इंडियाने येथे चांगली कामगिरी करत १८ चेंडू आणि नऊ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात विरोधी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आठ गडी गमावून १७८ धावा केल्या होत्या.