भारतीय संघ २०२२ च्या टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीतील पराभवातून पुढे सरकला आहे. तसेच सध्या बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीतही पाकिस्तान संघाचा पराभव झाला आणि खेळाडू त्यातून सावरत इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहेत. दरम्यान, मोहम्मद रिझवानने २०२१ च्या टी-२० विश्वचषकातील, भारताविरुद्धचा विजय नेहमी लक्षात राहण्या मागचे एक खास कारण सांगितले आहे.
२०२१ च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा १० विकेट्सने पराभव केला होता. विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ होती. या स्पर्धेत भारत ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला होता. त्याचवेळी पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला. या सामन्यात पाकिस्तानच्या विजयानंतर रिझवानसोबत असे काही घडले जे त्याच्या कायम लक्षात राहिल.
रिजवानने ब्रिटीश प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, भारतावरील विजयानंतर तो जेव्हा आपल्या देशात परतला. तेव्हा दुकानदार त्याच्याकडून पैसे घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे त्याला साहित्य फुकटात मिळत होते.
रिझवान म्हणाला, “भारताविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर मला वाटले की हा एक सामान्य सामना आहे. कारण आम्ही सहज जिंकलो, पण जेव्हा मी पाकिस्तानला परतलो. तेव्हा हा विजय किती खास आहे. हे मला पाकिस्तानमध्ये आल्यावर समजले होते. मी जेव्हा दुकानात जायचो तेव्हा. त्यांनी माझ्याकडून पैसे घेतले जात नव्हते. ते म्हणायचे तुम्ही जा, तुम्ही जा. मी तुझ्याकडून पैसे घेणार नाही. लोक म्हणायचे इथे तुमच्यासाठी सर्व काही फुकट आहे. त्या सामन्यानंतर आम्हाला पाकिस्तानमध्ये असे प्रेम मिळत होते.”
इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानने गमावली मालिका –
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तान संघाने सलग दोन सामने गमावल्यानंतर मालिकाही गमावली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. पाकिस्तानचा संघ १९५९ नंतर पहिल्यांदाच घरच्या मैदानावर सलग तीन कसोटी सामने हरला आहे. मात्र, पाकिस्तानच्या पराभवाचे कारण संघाची खराब कामगिरी नाही. इंग्लंडचा संघ नव्या शैलीत कसोटी क्रिकेट खेळत असून सर्वच संघांना इंग्लंडविरुद्ध विजय मिळवणे कठीण जात आहे. याशिवाय पाकिस्तानातील खेळपट्ट्याही सपाट आहेत, त्यावर इंग्लंडला धावा करणे सोपे झाले आहे.