Harbhajan Singh slam to trollers who trolled the families of the Australian players : एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेला पराभव चाहते अजूनही विसरू शकलेले नाहीत. चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून नाराजी व्यक्त करताना दिसत होते, तर काही चाहत्यांनी पराभवानंतर संयम गमावल्याचे दिसले. पराभवानंतर नाराज झालेल्या काही लोकांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेलच्या पत्नीला सोशल मीडियावर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वास्तविक, मॅक्सवेलची पत्नी विनी रमन ही भारतीय वंशाची आहे आणि ती या सामन्यात ऑस्ट्रेलियाला सपोर्ट करत होती. टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने आता विनी रमनला ट्रोल करणाऱ्यांना फटकारले आहे.
हरभजनने ट्रोल करणाऱ्यांची तोंडे केली बंद –
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून हरभजन सिंगने लिहिले की, “ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या कुटुंबीयांना ट्रोल करणे खूप वाईट आहे. ऑस्ट्रेलिया संघाने चांगली कामगिरी केली. त्यामुळे ते जिंकले पण आपणही चमकदार कामगिरी केली पण ऑस्ट्रेलियापेक्षा थोडी कमी. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या कुटुंबीयांना आपण ट्रोल करू नये. कृपया असे वागणे थांबवा आणि सन्मान राखा.”
विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला होता. हा पराभव कोणीही विसरू शकत नाही. फायनलमधील पराभवानंतर संघाचे खेळाडूही कमालीचे निराश दिसले, कर्णधार रोहित शर्माही रडत मैदानाबाहेर आला. आता टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यासाठी आणखी चार वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
सामन्याबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रथम फलंदाजी करायला उतरलेला भारतीय संघ ५० षटकांत २४० धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ विकेट गमावत २४१ धावा करत सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक १३७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. मार्नस लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या.
हेही वाचा – World Cup 2023: डेव्हिड वॉर्नरने निवृत्तीची अटकळ लावली फेटाळून; म्हणाला, “कोण म्हणालं मी…”
तत्पूर्वी, भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ आणि विराट कोहलीने ५४ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने ४७ आणि सूर्यकुमार यादवने १८ धावा केल्या. कुलदीप यादवने १० धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय इतर कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. त्याचबरोबर भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकले होते, मात्र ११व्या सामन्यात संघ मागे पडला. भारताला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने शेवटचा पराभव २००३ मध्ये केला होता.