Ravi Shastri Says Shardul Not A Little Boy : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन कसोटीत भारताला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीका केली आहे. त्याचबरोबर रवी शास्त्रींनी शार्दुल ठाकूरच्या कमकुवत गोलंदाजीवरही टीका केली. चौथा भारतीय वेगवान गोलंदाज शार्दुलने ५.३च्या इकॉनॉमी रेटने १०१ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. तो सर्वात महागडा भारतीय गोलंदाज होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसरीकडे, त्याच्या फलंदाजीच्या क्षमतेमुळे त्याचा प्लेइंग इलेव्हन मध्ये समावेश करण्यात आला होता, पण तो फलंदाजीतही अपयशी ठरला. पहिल्या डावात त्याने २४ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात २ धावा केल्या. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक शार्दुलची ही खराब कामगिरी पाहून संतापले. शार्दुल हा लहान मुलगा नसून चौथा वेगवान गोलंदाज आहे, असेही शास्त्री म्हणाले. जोहान्सबर्ग २०२२ कसोटीपासून शार्दुल ठाकूरने ७ कसोटी सामन्यांमध्ये केवळ ७ विकेट्स घेतल्या आहेत, यावरून त्याची कामगिरी किती खराब झाली आहे हे दिसून येते.

‘शार्दुल ठाकूर हा लहान मुलगा नाही’ –

या सामन्यात कॉमेंट्री करत असलेले रवी शास्त्री म्हणाले, “भारताच्या गोलंदाजी विभागात अनुभवाची कमतरता होती. त्यापैकी बुमराह आणि सिराज हे दोघेच अनुभवी होते. टीम इंडियाला येथे शमीची उणीव भासली. शार्दुल ठाकूर हा लहान मुलगा नाही. तो चौथा वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे परदेशात तिसरा वेगवान गोलंदाज हवा आहे, जो मोठा फरक निर्माण करू शकेल.”

हेही वाचा – AUS vs PAK 2nd Test : कर्णधार कमिन्सने पटकावल्या १० विकेट्स; ऑस्ट्रेलियाची पाकिस्तानविरुद्ध विजयी आघाडी

अर्शदीपने रणजी आणि प्रथम श्रेणी सामने खेळावेत –

दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी भारताच्या दोन्ही डावात सर्व विकेट घेतल्या. शास्त्री यांनी डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला रणजी ट्रॉफीचे सामने खेळण्याचा सल्ला दिला. समालोचनादरम्यान, सहकारी समालोचक मार्क निकोल्सने अर्शदीप सिंगचे नाव शास्त्रीला सुचवले की त्याला कसोटीत आणता येईल. यावर शास्त्रींनी विचारले की, अर्शदीप सिंग लाँग स्पेल टाकू शकतो का? त्याने पुरेसे रणजी सामने खेळले आहेत का? त्याने शक्य तितके रणजी आणि प्रथम श्रेणी सामने खेळावेत, अशी माझी इच्छा आहे.

हेही वाचा – IND vs SA : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघात मोठा बदल, मोहम्मद शमीच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

३ जानेवारीपासून दुसरी कसोटी –

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना नवीन वर्षात खेळवला जाणार आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर ३ जानेवारीपासून दोन्ही संघ आमनेसामने येतील. भारतीय संघाला दुसरी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे, तर यजमान संघ मालिकेत पाहुण्यांचा धुव्वा उडवण्याचा प्रयत्न करेल. दक्षिण आफ्रिकेचा संघ डीन एल्गरच्या निरोपाच्या कसोटी सामन्यात विजयाकडे पाहत आहे, तर भारतीय संघाला ही कसोटी जिंकून विजयाने दौरा संपवायचा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After indias humiliating defeat ravi shastri slams shardul thakur and says he is not a little boy vbm