Vice-captain of the Indian Test Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी दिल्लीत पार पडली. या कसोटीनंतर बीसीसीआयने मालिकेतील उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयने संघात कोणताही बदल केलेला नाही, मात्र फॉर्मात नसलेल्या केएल राहुलकडून उपकर्णधारपद काढून घेतले आहे.त्याला मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये जबाबदारी मिळाली होती. कदाचित या जबाबदारीमुळे तो पहिल्या दोन कसोटी सामन्यांपैकी प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळवू शकला.
आता बीसीसीआयने त्याच्याकडून ही जबाबदारी काढून घेतली असल्याने त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळले जाऊ शकते. जर केएल राहुल संघाबाहेर असेल, तर शुबमन गिल रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करेल हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्याच्याकडून उपकर्णधारपद हिसकावून घेतल्यानंतर कोणता भारतीय खेळाडू ही जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे, हा प्रश्न आहे.
संघाचा उपकर्णधार होण्यासाठी कोणत्याही खेळाडूने सतत संघात असणे आवश्यक असते, याचा अर्थ प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूच्या स्थानाबाबत शंका नसावी. अशा परिस्थितीत केएल राहुलकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आल्यानंतर केवळ ३ खेळाडूंपैकी एकाकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
रोहित शर्मा घेणार निर्णय?
दरम्यान, उपकर्णधारपदी कुणाची वर्णी लागणार? याचा निर्णय कर्णधार रोहित शर्मा घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मालिकेतील उर्वरीत दोन सामन्यांमध्ये भारताचं उपकर्णधारपद कोण सांभाळणार, याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार बीसीसीआयनं रोहित शर्माला दिले आहेत.
हेही वाचा – IPL 2023: सोळाव्या हंगामापूर्वी ‘CSK’साठी वाईट तर ‘RCB’साठी आली चांगली बातमी, घ्या जाणून
पुढचा उपकर्णधार कोण?
भविष्याकडे पाहता रोहित शर्मा श्रेयस अय्यरला त्याचा उत्तराधिकारी म्हणून तयार करू शकतो. अय्यर मागील काही कालावधीपासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि पाचव्या क्रमांकावर सातत्याने धावा करत आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा त्याला उपकर्णधार बनवू शकतो. ऋषभ पंत या संघात असता तर कोणताही विचार न करता त्याला संघाचा उपकर्णधार बनवता आला असता.
अन्य दोन पर्याय म्हणून रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांची नावे पुढे येत आहेत. हे दोन भारतीय अनुभवी फिरकीपटू ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पेलू शकतात. देशांतर्गत क्रिकेट व्यतिरिक्त अश्विनने आयपीएलमध्येही कर्णधारपद भूषवले आहे. त्याला या पदाची बरीच समज आहे, तर जडेजाने नुकतेच आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व केले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या-चौथ्या कसोटीसाठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.