Rohit Sharma explained the reason behind the defeat:भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे मालिकेतील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी जिंकला आहे. यासह कांगारू संघाने मालिकाही २-१ अशी जिंकली. या सामन्यात कांगारु संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २७० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा २४८ धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ २०१९ नंतर भारतात द्विपक्षीय मालिका जिंकणारा पहिलाच संघ ठरला. पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार आपण कुठे कमी पडलो, याबाबत खुलासा केला.
अशा सामन्यांमध्ये भागीदारी करणे खूप महत्त्वाचे –
या दणदणीत पराभवानंतर रोहित शर्मा सामन्यानंतर म्हणाला, “मला वाटत नाही की धावा जास्त होत्या, परंतु येथे फलंदाजी करणे थोडे कठीण होते. आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. अशा सामन्यांमध्ये भागीदारी करणे खूप महत्त्वाचे असते, परंतु आम्ही ते करू शकलो नाही. जेव्हा-जेव्हा आमची भागीदारी झाली तेव्हा विकेट पडत राहिल्या.”
एका फलंदाजाने खेळ शेवटपर्यंत नेणे आवश्यक होते –
सामन्याच्या सादरीकरणात मुरली कार्तिकशी संवाद साधताना रोहित म्हणाला, “आम्ही सुरुवातीपासून अशा परिस्थितीत खेळत आलो आहे. चांगली सुरुवात केल्यानंतर एका फलंदाजाने खेळ शेवटपर्यंत नेणे आवश्यक होते, परंतु तसे झाले नाही. तथापि, हा सामना आणि मालिका जिंकण्यासाठी आम्ही सर्वांनी आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. हा पराभव एका किंवा दोन खेळाडूंमुळे झालेला नाही. मी कोणत्याही एका खेळाडूला दोष देत नाही आणि संघही देत नाही. हा प्रत्येकजणाचा पराभव आहे.”
या सामन्याचे श्रेय ऑस्ट्रेलियाला द्यायला हवे –
रोहित शर्मा पुढे म्हणाला, “आम्हाला या मालिकेतून काही सकारात्मक गोष्टीही मिळाल्या. मी केवळ या तीन एकदिवसीय सामन्यांच्या आधारे माझ्या संघाच्या कामगिरीचे मूल्यांकन करत नाही, गेल्या ९ एकदिवसीय सामन्यांमधून आम्हाला खूप सकारात्मक गोष्टी मिळाल्या. या मालिकेतून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. या सामन्याचे श्रेय ऑस्ट्रेलियाला द्यायला हवे. त्यांच्या दोन्ही फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली आणि नंतर त्यांच्या वेगवान गोलंदाजांनीही दबाव निर्माण केला.”
चेन्नईतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने ४९ षटकांत सर्व १० गडी गमावून २६९ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये त्यांच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकही करता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक ४७ धावा केल्या. त्याच्याशिवाय अॅलेक्स कॅरी ३८, ट्रॅव्हिस हेड ३३ धावा करून बाद झाले.
भारतीय गोलंदाजीवर नजर टाकली तर लेगस्पिनर कुलदीप यादवने चमकदार कामगिरी केली. कुलदीपने १० षटकात ५६ धावा देऊन ३ विकेट घेतल्या, पण त्याची एक विकेट खूपच खास होती. या सामन्यात कुलदीप यादवशिवाय हार्दिक पांड्यानेही शानदार गोलंदाजी करत ८ षटकात ४४ धावा देत ३ बळी घेतले. याशिवाय मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनीही २-२ बळी घेतले.