Police has started patrolling outside the house of Kuldeep Yadav: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्याने देशातील अनेक ठिकाणी चाहते प्रचंड संतापले आहेत. टीम इंडियाने हा सामना एवढा गांभीर्याने घेतला नसल्याचे त्यांना वाटते. फक्त अंतिम फेरी गाठण्यापर्यंत गांभीर्य दाखवून दिले आहे, असे काही चाहत्यांचे मत आहे. त्यामुळेच टीम इंडियाला अंतिम सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. देशात अनेक ठिकाणी क्रिकेट चाहते संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे कानपूरमधील डिफेन्स कॉलनीत राहणाऱ्या कुलदीप यादवच्या घराबाहेर पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.
अशात अंतिम सामना खेळणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंबद्दल चाहत्यांनी कोणतीही नाराजी दाखवू नये. यासाठी पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. कानपूरमधील डिफेन्स कॉलनीत राहणाऱ्या कुलदीप यादवच्या घराबाहेर पोलीस निरीक्षक आणि हवालदारांनी गस्त सुरू केली आहे. सामना हरल्यानंतर कुलदीप यादवच्या घरात शांतता आहे. घरातून कोणीही बाहेर पडत नाही. एका स्थानिक वृत्तवाहिनीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये कुलदीपच्या घराबाहेर दोन पोलीस तैनात केलेले दिसतात. दोन पोलीस गेटबाहेर सतर्क उभे आहेत.
कुलदीप यादवच्या घराबाहेर पोलिसांची गस्त –
कुलदीप यादवच्या घराभोवती कोणत्याही संतप्त चाहत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु नये, म्हणून पोलिसांना आधीच सतर्क करण्यात आले आहे. कारण दिवसभरात शहरातील अनेक क्रिकेटप्रेमी कुलदीपच्या घराबाहेर पोहोचले होते. प्रसारमाध्यमांचाही गराडा होता.
पोलिसांनी दिली माहिती –
जाजमाऊ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद सिसोदिया यांनी सांगितले की, सतर्कतेसाठी कुलदीप यादवच्या घराबाहेर गस्तीवर पोलिसांना पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत कोठूनही कोणत्याही प्रकारचा निषेध किंवा विरोध व्यक्त केल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. घरच्यांनीही आमच्याकडून अशी कोणतीही सुरक्षा मागितली नाही. तरीही ही आमची गस्त सुरु आहे. कुलदीपच्या घराबाहेर आमचे पोलिस पथक हजर आहे.
कुलदीप यादवची अंतिम सामन्यातील कामगिरी –
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २४० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाने ४३ षटकांत ४ गडी गमावून २४१ धावांचे पूर्ण केले. या सामन्यात कुलदीप यादव फलंदाजी करताना १८ चेंडूत १० धावा काढून नाबाद राहिला. त्याचबरोबर लक्ष्याचा बचाव करताना त्याने १० षटकांत ५६ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही.