Pakistani cricketers share Palestine flag: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. या युद्धात काही लोक इस्रायलच्या सोबत आहेत तर काही लोक पॅलेस्टाईनच्या लोकांना साथ देत आहेत. पॅलेस्टाईनला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचाही समावेश आहे, जे सध्या भारतात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकाचा भाग आहेत. विश्वचषक स्पर्धेत खेळणारे पाकिस्तानी क्रिकेटपटू शादाब खान, उसामा मीर आणि मोहम्मद नवाज यांनी पॅलेस्टाईनच्या बाजूने एकजूट दाखवली आहे. तिन्ही खेळाडूंनी पॅलेस्टाईनचा ध्वज एक्सवर शेअर केला आहे.
याआधी पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने श्रीलंकेविरुद्धचा पाकिस्तानचा विजय गाझावासीयांना समर्पित केला होता. हा विजय गाझाच्या बंधू-भगिनींना समर्पित असल्याचे रिझवानने म्हटले होते. रिझवान (१३१) याने नाबाद शतक झळकावले. तर युवा अब्दुल्ला शफीक (११३) याने वनडेतील पहिले शतक झळकावले होते. ज्यामुळे पाकिस्तानने विश्वचषकातील सर्वोच्च लक्ष्याचा पाठलाग ४ गडी गमावून ३४५ धावांचा यशस्वी पाठलाग केला.
या विजयानंतर मोहम्मद रिझवानने एक्सवर लिहिले होते की, “हे गाझातील आमच्या बंधू-भगिनींसाठी आहे. संघाच्या विजयात योगदान दिल्याबद्दल आनंद झाला. हा विजय सोपा करून देण्याचे श्रेय संपूर्ण संघाला, विशेषत: अब्दुल्ला शफीक आणि हसन अली यांना जाते. हैदराबादच्या लोकांचे अद्भूत आदरातिथ्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.”
हेही वाचा – NZ vs AFG: मिचेल सँटनरने शानदार झेलवर प्रतिक्रिया देताना जिंकली चाहत्यांची मनं; म्हणाला, “चेपॉक माझे दुसरे…”
टीम इंडियाने पाकिस्तानचा उडवला होता धुव्वा –
टीम इंडियाने विश्वचषकातील पहिले तीनही सामने जिंकले आहेत. या स्पर्धेत भारताने आपल्या मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली होती. चेन्नईत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा ६ गडी राखून पराभव केला होता. यानंतर दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ८ विकेट्सने पराभव केला. त्यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. त्यानंतर पाकिस्तान संघावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.