भारताला मंगळवार म्हणजेच २० सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. भारताला ही मालिका मायदेशात खेळायची असल्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी आव्हान नक्कीच सोपे नसेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या टी२० मालिकेला २० सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने सरावही सुरू केला आहे. दरम्यान यावेळी ऑस्ट्रेलिया संघातील एका खेळाडूवर सर्वांच्याच नजरा असणार आहेत. हा खेळाडू म्हणजे आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्समध्ये दमदार कामगिरी केलेला टिम डेव्हिड होय.

सिंगापूर आंतरराष्ट्रीय संघाकडून १४ सामने टिम डेविड खेळला आहे आणि आता तो ऑस्ट्रेलिया संघाकडून भारतीय संघाविरुद्ध पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा टिम आता ऑस्ट्रेलियाकडून नेमकी कशी कामगिरी करेल? याकडे अनेकांचं लक्ष आहे. टी२० मध्ये त्याची सरासरी ४६.५० इतकी आहे. त्याच वेळी, त्याचा स्ट्राईक रेट देखील १५८ इतका राहिला आहे. आयपीएल २०२२ मध्ये, मुंबई इंडियन्सने टिम डेव्हिडला नियमित संधी दिली आणि त्याने जबरदस्त फटकेबाजी केली. या हंगामात खेळल्या गेलेल्या ८ सामन्यांमध्ये डेव्हिडने २१६.२७ च्या स्ट्राइक रेटने १८६ धावा केल्या. या दरम्यान त्याने १६ षटकार आणि १२ चौकारही मारले. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाकडूनही तो अशीच कामगिरी करतो का? हे पाहावे लागेल.

कसे असतील दोन्ही संघ?

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया संघ:

अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), ऍश्टन ऍगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक) , कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅडम झम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, सिन ऍबॉट.