देशातील अधिकृत बॉक्सिंग संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्यानंतर ‘बॉक्सिंग इंडिया’तर्फे आयोजित पहिल्यावहिल्या राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेकडे भारताच्या आघाडीच्या बॉक्सिंगपटूंनी पाठ फिरवली आहे. मात्र राष्ट्रीय स्पर्धेत खेळलात, तरच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी देशाचे प्रतिनिधित्व करता येईल, असा सूचक इशारा ‘बॉक्सिंग इंडिया’ने त्यांना दिला आहे.
विजेंदर सिंग, शिवा थापा, एल. देवेंद्र सिंग तसेच विकास कृष्णन यांसारखे ऑलिम्पियन बॉक्सिंगपटू नागपूरमधील विभागीय क्रीडा संकुलात रंगलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले नाहीत. ऑलिम्पिक बंदी उठल्यावर दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत या दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार होती. तसेच राष्ट्रीय स्पर्धेतून आगामी स्पर्धासाठी सज्ज आहोत, हे दाखवून देण्यासाठी तरी अव्वल बॉक्सिंगपटू राष्ट्रीय स्पर्धेत खेळतील, असे वाटले होते, पण प्रत्येकाने नानाविध कारणे पुढे करत राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. बॉक्सिंग संघटनेवर असलेले उत्तरेकडील गटाचे वर्चस्व खालसा झाल्यामुळे उत्तरेकडील या बॉक्सिंगपटूंनी राष्ट्रीय स्पर्धेतून अंग काढून घेतल्याचे बोलले जात आहे.
 ‘‘गेली दोन वर्षे राष्ट्रीय स्पर्धा होत नसल्यामुळे उदयोन्मुख खेळाडूंना कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळत नव्हती. गुरचरण सिंग आणि दिवाकर प्रसादसारख्या ऑलिम्पियन बॉक्सिंगपटूंना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे अनेक गुणवान खेळाडू या स्पर्धेतून देशाला मिळणार आहेत. या गुणी बॉक्सिंगपटूंवर अन्याय होता कामा नये. त्यामुळे त्यांना फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तसेच भारताच्या सराव शिबिरात थेट संधी दिली जाणार आहे. मात्र गतकामगिरीच्या आधारावर आघाडीच्या बॉक्सिंगपटूंचा सराव शिबिरासाठी विचार करण्यात येईल. पण त्यासाठी त्यांना चाचणी फेरीचा अडथळा पार करावा लागेल,’’ असे बॉक्सिंग इंडियाचे महासचिव जय कवळी यांनी सांगितले.
तुषार वैती, नागपूर

Story img Loader