Rohit Sharma’s reaction to Ind defeat against BAN: आशिया चषक २०२३ च्या अंतिम सामन्यापूर्वी, टीम इंडियाला सुपर फोर फेरीतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध ६ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाने संघात ५ बदल केले होते. जेणेकरून बेंच स्ट्रेंथ आजमावता येईल, पण तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव या खेळाडूंनी फलंदाजीत निराशा केली. त्यामुळे टीम इंडियाला स्पर्धेतील पहिल्यांदाच पराभव पत्कारावा लागला. या पराभवावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली.
या सामन्यात भारताचे अनेक स्टार फलंदाज अपयशी ठरले असतानाही शुबमन गिलने १२१ धावांची खेळी केली. मात्र, गिलने शेवटपर्यंत क्रीझवर टिकून राहायला हवे होते. त्याची विकेट पडणे हे भारतीय संघासाठी सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला आणि संघाला सामना गमवावा लागला. या सामन्यात बांगलादेशने ५० षटकात ८ विकेट्स गमावत २६५ धावा केल्या होत्या, पण प्रत्युत्तरात टीम इंडिया ४९.५ षटकात २५९ धावांवर ऑल आऊट झाली.
रोहितने सांगितले भारताच्या पराभवाचे कारण –
या सामन्यात टीम इंडियाच्या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपल्या संघाला पराभवाचा सामना का करावा लागला हे सांगितले. रोहित शर्मा म्हणाला की, “आम्हाला विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून काही खेळाडूंना आजमावायचे होते. आम्हाला हा खेळ कसा खेळायचा आहे, याबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. यापैकी काही खेळाडू विश्वचषकात खेळू शकतात. अक्षर पटेलने चांगली फलंदाजी केली, पण त्याला सामना पूर्ण करता आला नाही. शेवटी त्यांनी चांगली फलंदाजी केली, पण विजयाचे श्रेय पूर्णपणे बांगलादेशला जाते.”
हेही वाचा – IND vs BAN: रवींद्र जडेजाचा आणखी एक मोठा पराक्रम, कपिल देव नंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरला दुसराच भारतीय
रोहित शर्माकडून शुबमन गिलचे कौतुक –
शुबमन गिलबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, “त्याने शानदार शतक झळकावले आणि त्याला कसे खेळायचे हे माहित आहे. त्याला संघासाठी काय करायचे आहे याबद्दल तो अगदी स्पष्ट होता. गेल्या वर्षीपासून त्याचा फॉर्म उत्कृष्ट आहे आणि तो नवीन चेंडूंविरुद्ध खूप मजबूत आहे. गिल खरोखर कठोर परिश्रम करतो आणि त्याचे परिणाम त्याला मिळतात. आम्ही ज्या खेळपट्टीवर खेळलो त्यावर फलंदाजी करणे सोपे नव्हते, पण गिलने उत्कृष्ट खेळी खेळली.”
आता भारताचा सामना १७ सप्टेंबरला म्हणजेच रविवारी श्रीलंकेशी होणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान या मोसमात चौथ्या स्थानावर आहे. बांगलादेशने तिसर्या क्रमांकावर आपली मोहीम संपवली.