Ishan Kishan Dropped From India Test Squad : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी, यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाल्याची मीडिया रिपोर्ट्समध्ये बरीच चर्चा आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने या गोष्टींचा इन्कार केला असला, तरी त्याने इशानला रणजी ट्रॉफी खेळून संघात परत येण्याचा सल्ला दिला होता. आता या सर्व वादानंतर इशानने सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून आगामी आव्हाने आणि समस्यांसाठी तो स्वत:ला कसा तयार करत आहे, हे सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तविक, इशान किशनने डिसेंबर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून स्वतःला बाहेर ठेवले होते. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. अहवालात असे म्हटले आहे की, त्याचा दुबईचा दौरा आणि टेलिव्हिजन गेम शोमध्ये दिसल्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याची अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी निवड केली नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पूर्वसंध्येला द्रविडने सांगितले होते की, किशनने अद्याप स्वत:ला निवडीसाठी उपलब्ध करून दिलेले नाही.

त्याचवेळी झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनला त्याच्या रणजी खेळण्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, इशानने अद्याप त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही. अशा स्थितीत इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याची निवड होणे कठीण झाले होते आणि आता तसेच झाले. इशानची इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवड झाली नाही. त्याच्या जागी केएस भरतसह ध्रुव जुरेलची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा – IND vs ENG : भारतीय संघात निवड झालेला ध्रुव जुरेल कोण आहे? किट बॅग विकत घेण्यासाठी आईने विकली होती सोनसाखळी

काय म्हणाला राहुल द्रविड?

भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी काल पत्रकार परिषद घेऊन चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत इशान किशनला संघात स्थान मिळाले नसल्याचे सांगितले. इशाननेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्रांती मागितली होती, त्यात काही अडचण नाही, आम्ही त्याची मागणी मान्य केल्याचे राहुल म्हणाले होते. आता ईशान खेळण्यास तयार आहे की नाही याबाबत आम्हाला कोणतीही माहिती मिळालेली नाही. जर तो खेळण्यास तयार असेल आणि त्याला टीम इंडियामध्ये पुनरागमन करायचे असेल तर त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल जेणेकरून तो आता खेळण्यास तयार आहे हे आम्हाला कळेल. आता राहुल द्रविडच्या या वक्तव्यावर इशान किशननं मौन सोडलं आहे.

हेही वाचा – IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर, ‘या’ युवा खेळाडूला पहिल्यांदाच मिळाली संधी

इशान किशनने शुक्रवारी त्याच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये इशान योगा करत आहे, तो मैदानात धावतोय, तो सतत त्याच्या फिटनेसवर काम करत असल्याचे दिसत आहे. याशिवाय तो व्यायामही करताना दिसतो. यावरून स्पष्ट झाले आहे की, इशान किशनने राहुल द्रविडच्या प्रश्नालाच उत्तर दिले आहे. इशान खेळायला तयार आहे की नाही हे आम्हाला माहीत नाही, असे राहुल द्रविड म्हणाला होता. आता इशानने या व्हिडिओद्वारे सांगितले आहे की तो तयार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After rahul dravid advised him to play ranji cricket ishan kishan reply by sharing a video vbm