श्रीलंकेविरुद्ध वन-डे आणि टी-२० मालिका आटोपल्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या संघातील जागेवर प्रश्नचिन्ह उठण्याचं सत्र अचानक बंद झालेलं पहायला मिळालं. यासाठी धोनीने लंकेविरुद्ध फलंदाजीत दाखवलेली चमक आणि यष्टीरक्षणात आपल्या चपळाईने मिळवलेले बळी हे देखील तितकेच कारणीभूत आहेत. मात्र याचसोबत संघातील महत्वाच्या खेळाडूंनीही महेंद्रसिंह धोनीला संघात आपला पाठींबा दर्शवला आहे. धोनीवर टीका करणाऱ्यांना संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सुनावल्यानंतर संघाचा उप-कर्णधार रोहित शर्माही धोनीच्या बचावासाठी धावून आला आहे.

अवश्य वाचा – वन-डे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा विराटपेक्षा सर्वोत्तम फलंदाज – संदीप पाटील

“धोनीच्या जागेवर जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं, याचं मला खरचं आश्चर्य वाटतं. धोनीच्या कामगिरीवर लोकांच्या मनात शंका असण्याचं कारणच मला समजत नाही. त्याच्या सध्याच्या कामगिरीकडे पाहिलं की एक गोष्ट आपल्याला नक्की लक्षात येईल की त्याची जागा घेणारा खेळाडू सध्यातरी भारतात नाही.” ‘इंडिया टूडे टीव्ही’ ला दिलेल्या मुलाखतीत रोहितने धोनीला आपला पाठींबा दर्शवला. वन-डे क्रिकेटमध्ये धोनी मधल्या फळीत फलंदाजीसाठी येतो, त्यामुळे आमच्याइतकी फलंदाजीची संधी त्याला मिळत नसल्याचंही रोहित म्हणाला.

अवश्य वाचा – रोहित शर्माच्या ‘हिटमॅन’ नावामागची कहाणी माहिती आहे??

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरुद्ध धोनीने पहिल्या टी-२० सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत नाबाद ३९ धावा कुटल्या. इंदूरच्या सामन्यातही धोनीला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली, ज्यात धोनीने चांगल्या सुरुवातीनंतर २८ धावा काढल्या. “धोनी संघात राहिल की नाही हा निर्णय प्रशिक्षक आणि कर्णधार घेईल. मात्र धोनीला चौथ्या क्रमांकापासून सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना मी पाहिलेलं आहे. मी देखील आयपीएलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. या जागेवर फलंदाजी करणं अत्यंत कठीण असतं, आणि धोनी सध्या ती कामगिरी चांगल्या पद्धतीने बजावतो आहे.” धोनीच्या खेळाचं कौतुक करताना रोहित म्हणाला.

अवश्य वाचा – Blog: देशातले शेर, परदेशात सव्वाशेर ठरतील?

५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि निवड समितीचे प्रमुथ एम. एस. के. प्रसाद यांनी धोनी संघाचा अविभाज्य भाग असल्याचं स्पष्ट केलं होतं. प्रसाद यांनी २०१९ च्या विश्वचषकापर्यंत धोनी संघात कायम राहिल असे संकेतही दिले होते. त्यामुळे आगामी काळात धोनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असेल.

अवश्य वाचा – वयाच्या ३६ व्या वर्षी तुम्ही काय करत होतात? धोनीवर टीका करणाऱ्यांना रवी शास्त्रींचा सवाल

Story img Loader