Rohit Sharma run out video viral : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला गेला. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. दरम्यान या सामन्यातील रोहित शर्मा आणि शुबमन गिलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा धावबाद झाल्यानंतर शुबमन गिलवर संतापताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचे १४ महिन्यांनंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन निराशाजनक राहिले. पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना त्याने शानदार नेतृत्त्व केले. पण जेव्हा तो त्याच्या एकदिवसीय जोडीदारासह सलामीला आला, तेव्हा तो दुर्दैवी ठरला. रोहित शर्मा दुसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहितने शॉट खेळल्यानंतर धाव घेण्यासाठी नॉन स्ट्राइकिंग एंडवर असलेल्या शुबमन गिलला हाक दिली, पण शुबमनने ना त्याच्याकडे पाहिले ना त्याची हाक ऐकली. त्यामुळे दोघेही एकाच टोकाला उभे राहिले आणि रोहित शर्मा धावबाद झाला.

शून्य धावसंख्येवर भारताने पहिली विकेट गमावली. यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा मैदानातच गिलवर चिडताना दिसला. त्याने मैदानात गिलवर ओरडत आपला राग व्यक्त. या धावबादमध्ये चूक सर्वस्वी शुबमन गिलची होती. त्यामुळे गिल सोशल मीडियावरही ट्रोल होऊ लागला. रोहित शर्माचे चाहते गिलवर टीका करत आहेत.

रोहित शर्मा ठरला दुर्दैवी –

रोहित शर्मा आता १० नोव्हेंबर २०२२ नंतर पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला. पण तो दुर्दैवी होता आणि विशेष काही करू शकला नाही. रोहित धावबाद झाल्यानंतर गिलही काही विशेष करू शकला नाही आणि चौथ्या षटकात २३ धावांवर यष्टिचित झाला. कर्णधार आणि खेळाडू म्हणून रोहित शर्मासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-२० मालिका आहे. या मालिकेनुसार आगामी विश्वचषकात रोहित कोणती भूमिका बजावणार हेही ठरवले जाऊ शकते. आता १४ जानेवारीला होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात सर्वांच्या नजरा हिटमॅनच्या बॅटवर असतील.

हेही वाचा – IND vs AFG 1st T20 : शिवम दुबेच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर भारताचा शानदार विजय, अफगाणिस्तानवर सहा विकेट्सनी मात

भारताची अफगाणिस्तानवर ६ विकेट्सनी मात –

भारताने पहिल्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा सहा विकेट्सनी पराभव केला आहे. अफगाणिस्तानने या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून १५८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने १७.३ षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. शिवम दुबेने ४० चेंडूत ६० धावांची नाबाद खेळी केली. त्याचवेळी, रिंकू सिंग नऊ चेंडूत १६ धावा करून नाबाद राहिला. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना १४ जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After rohit sharmas run out the video of shubman getting angry at gill went viral in ind vs afg 1st t20 match in mohali vbm