ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकारात श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने आपल्या दिमाखदार फलंदाजीचा ठसा उमटवला आहे. परंतु बांगलादेशमध्ये सध्या सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेनंतर या प्रकारातून आपण निवृत्ती स्वीकारणार असल्याचे जयवर्धनेने जाहीर केले. कुमार संगकाराने चालू विश्वचषकानंतर ट्वेन्टी-२० प्रकाराला रामराम ठोकणार असे जाहीर केल्याच्या  दुसऱ्याच दिवशी जयवर्धनेने त्याचे अनुकरण केले आहे.
आयसीसीच्या ‘ट्विटर मिरर’ अभियानांतर्गत जयवर्धनेने ट्वेन्टी-२०मधून निवृत्तीची घोषणा केली. या ठिकाणी क्रिकेटपटूंना आपल्या चाहत्यांकरिता छायाचित्रांसहित संदेश पाठवण्याची मुभा आहे. आयसीसीने संगकारा आणि जयवर्धने यांच्या छायाचित्रासोबत म्हटले आहे की, ‘‘अखेरचा ट्वेन्टी-२० विश्वचषक. चला संस्मरणीय करूया.’’
आतापर्यंत झालेल्या चारही ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत ३६ वर्षीय जयवर्धनेने श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले आहे. ४९ सामन्यांत ३१.७८च्या सरासरीने आणि १३४.१७च्या स्ट्राइक रेटने त्याने १३३५ धावा केल्या आहेत. ट्वेन्टी-२०मध्ये सर्वाधिक धावा काढणारा तो श्रीलंकन क्रिकेटपटू आहे. याचप्रमाणे ट्वेन्टी-२०मध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये तो ब्रेन्डन मॅक्क्युलम (६४ सामन्यांत १९५९) पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे. मागील ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेच्या वेळी त्याने श्रीलंकेचे कर्णधारपद सांभाळले होते. परंतु अंतिम सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजकडून हार पत्करली होती.
ट्वेन्टी-२० प्रकारात आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या खास फलंदाजांमध्ये जयवर्धनेचा समावेश आहे. त्याच्या १०० धावा याच त्याच्या सर्वाधिक धावा आहेत. २०१०मध्ये झालेल्या विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पध्रेत गयाना येथे झिम्बाब्वेविरुद्ध त्याने हे शतक साकारले होते.
साऊथम्पटन येथे जून २००६मध्ये जयवर्धनेने इंग्लंडविरुद्ध ट्वेन्टी-२० पदार्पण केले. गतवर्षीच्या आयपीएल स्पध्रेत त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सचे नेतृत्व केले. परंतु या वर्षीच्या आयपीएल हंगामासाठी त्याला कुणीही खरेदी केले नाही.
संगकारा आणि जयवर्धने यांच्या निवृत्तीच्या घोषणांविषयी श्रीलंकेचा सलामीवीर लाहिरू थिरिमाने म्हणाला की, ‘‘ते महान क्रिकेटपटू आहेत. त्यांच्या कामगिरीची तुलनाच होऊ शकत नाही.’’
श्रीलंकेच्या आणि जागतिक क्रिकेटच्या इतिहासात जयवर्धनेचे स्थान मात्र अबाधित राहील ते प्रामुख्याने त्याच्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरीसाठी. १४३ कसोटी सामन्यांत त्याने ५०च्या सरासरीने ११३१९ धावा केल्या आहेत. कोलंबोच्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राऊंडवर जयवर्धनेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३७४ या आपल्या सर्वोच्च धावा केल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याच्या खात्यावर १० हजारांहून अधिक धावा आहेत.

‘‘संगकाराप्रमाणेच मी विचार केला. पुढील आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषकात श्रीलंकेच्या संघात मी स्वत:ला पाहत नाही. त्यामुळे संघातील स्थान बळकावून ठेवणे मला पसंत नाही. युवा खेळाडूंनी पुढे येऊन आपले स्थान संघात पक्के करावे!’’
-महेला जयवर्धने