Yashasvi Jaiswal retired hurt after a century : भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने राजकोट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले, पण त्यानंतर तो पाठीच्या समस्येशी झुंजताना दिसला. त्याला मदत करण्यासाठी भारतीय फिजिओ दोनदा मैदानात आले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि शेवटी त्याला मैदान सोडावे लागले. यशस्वीने मैदान सोडल्यानंतर काही षटकानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. भारतीय संघाने दुसऱ्या डावात ५१ षटकानंतर २ बाद १९६ धावा केल्या असून ३२२ धावांची आघाडी घेतली आहे.
या सामन्यांच्या दुसऱ्या डावात सलामीवीर यशस्वी जैस्वालने मार्क वूडला चौकार ठोकत तिसरे कसोटी शतक झळकावले. त्याने १२२ चेंडूचा सामना करताना ९ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने शतक झळकावले. यानंतर या खेळीत फक्त चार धावा जोडल्यांतर यशस्वी जैस्वाल रिटायर्ट हर्ट झाला. तत्पूर्वी त्याने शुबमन गिलबरोबर १५५ धावांची भागीदारी साकारली.
यशस्वी आणि गिलची तिसऱ्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी –
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा १९ धावा करून बाद झाला, तेव्हा दुसऱ्या डावात भारताची धावसंख्या ३० धावा होती. मात्र, त्यानंतर यशस्वी जैस्वालसह शुबमन गिलने तिसऱ्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी केली. यानंतर यशस्वी जैस्वाल पॅव्हेलियनमध्ये परतला आणि ही भागीदारी तुटली. यशस्वीने मैदान सोडल्यानंतर रजत पाटीदार चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. मात्र, त्याला साधा भोपळही फोडता आला नाही. त्यामुळे त्याच्या धावांची पाटी कोरी राहिली. सध्या कुलदीप यादव तीन धावांवर नाबाद असून शुबमन गिल ६५ धावांवर नाबाद आहे.
भारताने घेतली ३२२ धावांची आघाडी –
त्याचवेळी पाठदुखीमुळे १३३ चेंडूत १०४ धावा करून यशस्वी जैस्वाल दुखापतग्रस्त होऊन रिटायर्ड हर्ट झाला. त्याने आतापर्यंतच्या खेळीत नऊ चौकार आणि पाच षटकार मारले आहेत. तो पुढे फलंदाजीला येणार की नाही याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही. इंग्लंडकडून जो रूट आणि टॉम हार्टले यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी आतापर्यंत ३२२ धावांची झाली आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या, तर इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर आटोपला होता. पहिल्या डावाच्या जोरावर टीम इंडियाला दुसऱ्या डावात १२६ धावांची आघाडी मिळाली.