NCA declares Shreyas Iyer fit : रणजी ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या टीम इंडियाच्या काही खेळाडूंबाबत गेल्या काही दिवसांपासून नाट्य सुरू आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या इशाऱ्यानंतरही इशान किशनने रणजीपासून अंतर ठेवले आहे. त्याचवेळी श्रेयस अय्यरला त्याच्या खराब फॉर्ममुळे इंग्लंडविरुद्धच्या मागील तीन सामन्यांमधून संघातून वगळण्यात आले होते. त्याला रणजी खेळण्याचा सल्लाही दिला होता. मात्र पाठदुखीमुळे श्रेयस रणजीपासून दूर राहिला होता. आता बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने त्याच्या दुखापतीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
श्रेयसला कोणतीही दुखापत नाही –
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात एनसीएने श्रेयसला फिट घोषित केले आहे. यानंतर सोशल मीडियावर त्याच्याबद्दल अनेक गोष्टी सुरू आहेत. श्रेयसने रणजीमध्ये न खेळण्याचे कारण देत दुखापतीची खोटी कथा रचल्याचेही काही चाहत्यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे क्रीडा विज्ञान आणि औषध विभागाचे प्रमुख नितीन पटेल यांनी श्रेयसला कोणतीही नवीन दुखापत नसून तो तंदुरुस्त असल्याची पुष्टी केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यर पाठदुखीमुळे बडोद्याविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात खेळणार नव्हता. त्याचवेळी, नितीन यांच्या मते, अय्यरला कोणतीही दुखापत नाही आणि तो शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या सामन्यासाठी निवडीसाठी उपलब्ध आहे. शुक्रवारी मुंबईचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना बडोद्याविरुद्ध होणार आहे.
गेल्या आठवड्यात बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी खेळाडूंना इशारा दिला होता की, केंद्रीय करार असलेल्या क्रिकेटपटूंनी रणजी ट्रॉफी न खेळल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. मानसिक थकव्यामुळे यष्टिरक्षक इशान किशनने दक्षिण आफ्रिका दौरा मध्यंतरी सोडला होता. त्यानंतर तो झारखंडकडून रणजी खेळण्यासाठी गेला नाही. तो बडोद्यात हार्दिक पंड्यासोबत आयपीएलची तयारी करत आहे. जय शाहने केंद्रीय करारातील खेळाडूंना कडक इशारा दिला होता की, जर ते रणजीपासून दूर राहिल्यास निवड समिती कोणताही कठोर निर्णय घेऊ शकतात.
हेही वाचा – IPL 2024 : गुजरात टायटन्सला मोठा धक्का! आयपीएलमधून ‘हा’ स्टार वेगवान गोलंदाज बाहेर
श्रेयसला बडोद्याविरुद्ध खेळण्यास सांगितले –
वृत्तानुसार, एनसीएकडून वैद्यकीय अहवाल आल्यानंतर राष्ट्रीय निवड समितीने श्रेयस अय्यरला रणजी खेळण्यास सांगितले आहे. श्रेयस याआधी पाठीच्या दुखापतीमुळे प्रभावित झाला होता आणि कोलकाता नाईट रायडर्ससाठी गेल्या वर्षीच्या आयपीएलला तो मुकला होता. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४ मध्ये तो कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) चे नेतृत्व करण्याची शक्यता आहे.