विश्वचषक गाजवणारा आणि त्यानंतर कर्करोगावर मात करून पुन्हा मैदानावर परतणारा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिले तीन सामने आणि एकमेव ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी सोमवारी निवड समितीची बैठक होणार आहे.
एकमेव ट्वेन्टी-२० सामन्यासाठी स्वतंत्र संघ निवडण्याची शक्यता कमी आहे. फक्त त्या प्रकारासाठी काही बदल अपेक्षित आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय एकदिवसीय संघाने जून महिन्यात चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकण्याची किमया साधली होती. त्यानंतर वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या तिरंगी क्रिकेट स्पध्रेतही भारताने जेतेपद प्राप्त केले होते. ३१ वर्षीय डावखुरा फलंदाज युवराज भारतीय संघात परतण्याची चिन्हे असली तरी त्याची खात्री देणे कठीण आहे.
युवराज २७ जूनला धर्मशाळा येथे इंग्लंडविरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता, परंतु खराब कामगिरीमुळे त्यानंतर त्याची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर युवराजने फ्रान्समध्ये जाऊन तंदुरुस्तीबाबत मेहनत घेतली. तिथून परतलेल्या युवीने पुन्हा स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये आपले नाणे खणखणीत असल्याचा इशारा दिला. वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात त्याने १२३, ४० आणि ६१ धावा केल्या, तर ट्वेन्टी-२० सामन्यात ५२ धावांची खेळी साकारली. चॅलेंजर क्रिकेट स्पध्रेतही इंडिया रेडविरुद्ध ८४ आणि अंतिम सामन्यात २९ धावा त्याने  काढल्या.
मध्यमगती गोलंदाजी करू शकणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची धोनीला भारतीय संघात आवश्यकता आहे, परंतु बडोद्याचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण सध्या दुखापतीचा सामना करीत आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबईच्या अभिषेक नायरला भारतीय संघात स्थान मिळू शकेल. मागील पाच डावांमध्ये नायरची कामगिरी १०२*, ५७, ९१, ७५* आणि १२ अशी आहे. यापैकी पहिले दोन सामने प्रथम श्रेणीचे, तर नंतरचे तीन ‘अ’ दर्जाच्या क्रिकेटमधील आहेत.
संभाव्य भारतीय संघ असा असेल
आघाडीच्या फळीमध्ये शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी हे प्रारंभीचे फलंदाज निश्चित झाल्यानंतर सहाव्या क्रमांकावरील विशेषज्ञ फलंदाज म्हणून युवराज सिंगला संधी मिळू शकते. राखीव फलंदाज म्हणून दिनेश कार्तिकचे संघातील स्थान निश्चित असेल.
 ल्ल  फिरकी गोलंदाजीप्रमाणेच अष्टपैलू ही ओळख जपणारे रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा यांचे संघातील स्थान अबाधित असेल. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत अश्विनला विश्रांती देण्यात आली होती, तेव्हा लेग-स्पिनर अमित मिश्राने १८ बळी घेतले होते. त्यामुळे मिश्राला राखीव वेगवान गोलंदाज म्हणून स्थान मिळेल. त्याला आव्हान असेल ते वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्ध प्रभावी कामगिरी करणाऱ्या परवेझ रसूलचे.
 ल्ल  तीन वेगवान गोलंदाजांच्या संघातील स्थानांकरिता इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांची जागा पक्की असेल. या पाश्र्वभूमीवर जयदेव उनाडकट, मोहित शर्मा आणि आर. विनय कुमार यांच्यापैकी एकाची राखीव वेगवान गोलंदाज म्हणून संघात वर्णी लागू शकेल. याचप्रमाणे मुंबईचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायर इरफान पठाणऐवजी भारतीय संघात स्थान मिळवतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Story img Loader