ऑलिम्पिक कांस्यपदकासह सायनाने २०१२ संस्मरणीय ठरवले. नवीन वर्षांची दणक्यात सलामी करण्यासाठी भारताची फुलराणी सायना नेहवाल सज्ज झाली आहे. निमित्त आहे कोरियन सुपर सीरिजचे. वर्षांतल्या पहिल्याच सुपर सीरिज दर्जाच्या स्पर्धेत दिमाखदार प्रदर्शनासाठी सायना आतुर आहे.
गुडघ्याच्या दुखापतीने सायनाला गेल्या वर्षी चांगलेच सतावले होते. या वर्षी दुखापतीवर मात करीत चांगला खेळ करण्याचा सायनाचा प्रयत्न असणार आहे.
पुढच्या फेरीत आगेकूच करण्यासाठी अनुकूल असा ड्रॉ सायनाला मिळाला आहे. थायलंडच्या सॅपसिरी तेअरटानचायशी सायनाची पहिली लढत आहे. प्राथमिक फेऱ्यांचा अडथळा पार केल्यास उपांत्यपूर्व फेरीत सायनासमोर थायलंडची युवा रतचंन्नोक इनथॅनॉनचे आव्हान असेल. रतचंन्नोकला नमवल्यास सायनाला उपांत्य फेरीत ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेती लि झेरूईचा मुकाबला करावा लागू शकतो.
अन्य खेळाडूंमध्ये पी.व्ही. सिंधूची पहिली लढत लिंडावेनी फॅट्रीशी होणार आहे. ही लढत जिंकल्यास सिंधूला दुसऱ्याच फेरीत लि झेरूईचा सामना करावा लागू शकतो. पुरुष खेळाडूंमध्ये पारुपल्ली कश्यपची सलामीची लढत इंग्लंडच्या राजीव ओयुसफशी होणार आहे. राजीवने २०१० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कश्यपला नमवले होते, मात्र गेल्या वर्षी झालेल्या चीन मास्टर्स स्पर्धेत कश्यपने या पराभवाचा बदला घेत विजय मिळवला होता. डिसेंबरमध्ये झालेल्या सय्यद मोदी ग्रां.प्रि. स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा कश्यप जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा