भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकदामीचा कारभार पाहणारा राहुल द्रविडवर भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआय मोठी जबाबदारी टाकली आहे. राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यास सहमत झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत राहुल द्रविडने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी -२० वर्ल्डकपनंतर संपत आहे. टी २० वर्ल्डकपनंतर द्रविड भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारणार आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सूत्रांनी सांगितले की, द्रविडने प्रशिक्षक होण्यास संमती दिली आहे. यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. विक्रम फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहेत. भारतीय संघ आता बदलाच्या मार्गावर आहे. अनेक युवा खेळाडूंना यात सहभागी व्हायचे आहे. या सर्वांनी द्रविडसोबत काम केले आहे. भारतीय क्रिकेटसाठी हे खूप महत्त्वाचे असू शकते. राहुल द्रविड हा नेहमीच बीसीसीआयचा पर्याय होता.
यासह, द्रविडचा विश्वासू सहकारी पारस म्हांब्रेची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तो भरतची जागा घेईल, तर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्या बदलीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विक्रम राठोड संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कायम राहतील.
४८ वर्षीय द्रविड सध्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं काम पाहत असून यापूर्वीही त्याने श्रीलंकेच्या दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून काम केलंय. द्रविड १९ वर्षांखालील संघ आणि भारत अ संघाला प्रशिक्षणही देत आहे. अशाप्रकारे द्रविडला मुख्य संघाला प्रशिक्षण देण्यासाठी विचारणा झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मात्र द्रविडने तरुणांना क्रिकेटचे धडे देण्याला आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं काम पाहण्याचा प्राधान्य दिलं आहे. यापूर्वीही द्रविडने २०१६ आणि २०१७ साली अशाच पद्धतीची ऑफर नाकारली होती. आपण जे काम करतोय त्यामध्ये आपल्याला अधिक रस असल्याचं सांगत द्रविडने मुख्य संघाला प्रशिक्षण देण्याऐवजीन तरुण खेळाडूंना तयार करण्यासाठी क्रिकेट अकदामीमध्येच काम करण्याला प्राधान्य दिलं होतं.