न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ३०६ धावा करूनही भारताला या धावसंख्येचा बचाव करता आला नाही आणि न्यूझीलंडकडून सात गडी राखून पराभव झाला. आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने टीम इंडियाच्या पराभवावर टीका केली आहे. त्याने कर्णधार शिखर धवन, प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण आणि संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
वास्तविक, भारतीय संघ पहिल्या वनडेत केवळ पाच गोलंदाजी पर्यायांसह मैदानात उतरला होता. यामध्ये अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल यांचा समावेश आहे. मात्र, हे गोलंदाज केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांच्यातील विक्रमी भागीदारी मोडू शकले नाहीत. भारतीय संघाची ही रणनीती त्यांच्या कामी आली नाही.
सामन्यानंतर भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने विल्यमसन आणि लॅथमचे त्यांच्या खेळीसाठी अभिनंदन केले. तसेच भारतीय संघाने गोलंदाजीत अनेक चुका केल्या असल्याचे सांगितले. जाफरने ट्विट केले की, ”न्यूझीलंड तुम्ही चांगला खेळ दाखवला. ३०० चा स्कोअर सुद्धा २७० सारखा दिसत होता. विल्यमसनने नेहमीप्रमाणेच क्लास दाखवला, पण लॅथमने शानदार फलंदाजी केली आणि त्याचे श्रेय त्याला पात्र आहे. सलामीवीरासाठी खालच्या क्रमांकावर उतरणे आणि तरीही यशस्वी होणे सोपे नाही. टीम इंडियाने केवळ पाच गोलंदाज खेळवून चूक केली.”
त्यावर मायकल वॉनने त्याला प्रत्युत्तर देत भारतीय संघाचे वर्णन जुन्या जमान्यातील संघ असे केले. वॉनने लिहिले, ”हा जुना विचार करणारा भारतीय संघ आहे. तुमच्याकडे संघात सात नाही तर किमान सहा गोलंदाजी पर्याय असायला हवेत.”
भारताकडे बाकावर पर्याय नाहीत, असे नाही. दीपक हुडा, दीपक चहर, कुलदीप यादव पहिला वनडे खेळत नव्हते. यापैकी हुड्डा आणि चहर खालच्या क्रमावार फलंदाजी आणि गोलंदाजीही करू शकतात. दुसऱ्या वनडेत भारतीय संघात बदल होऊ शकतात. भारत आणि न्यूझीलंड संघ आता रविवारी हॅमिल्टनमध्ये आमनेसामने येणार आहेत. टीम इंडियासाठी ही करो या मरोचा सामना असणार आहे. कारण भारत जिंकल्यास मालिका १-१ अशी होईल. त्याचवेळी भारत हरल्यास मालिका गमावेल.