Video of Team India doing a special celebration in the dressing room: १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. एवढेच नाही तर वनडे विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत आठ सामने खेळले गेले आहेत, या सर्व ८ सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केले आहे.
आतापर्यंत एकदिवसीय विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. शनिवारी पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर हॉटेलमध्ये संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्व खेळाडूंनी मोठ्या थाटामाटात विजय साजरा केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये टीम हॉटेलमध्ये भारतीय संघाच्या खेळाडूंसाठी खूप मोठा केक बनवण्यात आला होता.
भारतीय संघाने आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ मध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि तिन्ही जिंकले आहेत. या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा, तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला होता. संघाने पाकिस्तानविरुद्धचा सामना ७ विकेटने जिंकला.
रोहित शर्माने संघासाठी खेळली जबरदस्त खेळी –
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सर्व गडी गमावून १९१ धावा केल्या होत्या. संघाच्या वतीने कर्णधार बाबर आझमने ५८ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय मोहम्मद रिझवानने ४९ धावांचे योगदान दिले होते. इमाम उल हकने ३६ धावा केल्या होत्या. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरात भारताने तीन गडी गमावून १९२ धावांचे लक्ष्य गाठले. संघाच्या वतीने कर्णधार रोहित शर्माने ६३ चेंडूंत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८६ धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याच्याशिवाय श्रेयस अय्यरने ५३* धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने ६ षटकांत ३६ धावा देत दोन तर हसन अलीने एक गडी बाद केला. आता भारताचा पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध १९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे होणार आहे.