मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीमुळे भारताचा वेगवान गोलंदाज इरफान पठाणलाही कमालीचे दु:ख झाले आहे. सचिनच्या फलंदाजीच्या आठवणी आमच्यासोबत कायम राहतील, त्या खेळी आम्हाला नेहमीच आनंद देतील, अशा शब्दांमध्ये पठाणने सोमवारी मुंबईतील एका कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले.
‘‘सचिनच्या निवृत्तीच्या निर्णयाने मलाही खूप दु:ख झाले. सचिनच्या खेळाने आपल्याला गेली अनेक वष्रे आनंद दिला, परंतु हा दिवस कधी तरी येणारच होता. त्यामुळे त्याच्या आठवणी आता आपल्यासोबत असतील,’’ असे मत पठाणने व्यक्त केले.
‘‘सचिनने क्रिकेटमध्ये शंभर शतके झळकावली आहेत. त्या त्याच्या यादगार खेळी पाहिल्या तरी तीन महिने सहज आपल्याला निखळ आनंद मिळू शकेल,’’ असे पठाणने सांगितले.
‘‘सचिनसोबत मी गेली काही वष्रे ड्रेसिंग रूममध्ये वावरलो आहे. त्याचे मैदानावरील आणि मैदानाबाहेरील वागणे, हे नेहमीच प्रेरणादायी असते,’’ असे तो पुढे म्हणाला.
टेबल टेनिस स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलणाऱ्या इरफानने सचिनच्या टेबल टेनिसच्या कौशल्याबाबतही किस्सा सांगितला. सचिन खुप चांगले टेबल टेनिस खेळतो. त्याला नमवणे खुपच कठीण आहे. तो आणि युवराज खुपच चांगल्या दर्जाचे टेबल टेनिस खेळतात. सचिनसह टेबल टेनिस खेळण्याचा आनंद काही औरच आहे. क्रिकेटप्रमाणे तो या खेळातही अग्रेसर आहे.
‘मुंबईत ही स्पर्धा ३० वर्षांच्या कालावधीनंतर होत आहे, ही खुप चांगली गोष्ट आहे. ही एक मोठी स्पर्धा असून, या स्पर्धेद्वारे आपल्याला अनेक गुणी उदयोन्मुख टेबल टेनिसपटू मिळतील. खेळाचा विकास होण्याच्या दृष्टीने अशा स्पर्धा आयोजित होणे फार आवश्यक आहे’, असे इरफानने सांगितले. टेबल टेनिसला पाठिंबा देण्यासाठी मी आलो आहे. हा खेळ शरीराला तंदुरुस्त ठेवतो. क्रिकेटपटू केवळ क्रिकेटला पाठिंबा देतात असे लोकांचे म्हणणे असते, मात्र ते पूर्ण खरे नाही असे इरफानने पुढे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा