Cricket World Cup 2023: विश्वचषकातील आठव्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंका संघाने ५० षटकांत नऊ गडी गमावून ३४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने ४८.२ षटकात ४ गडी गमावत ३४५ धावा करत सामना जिंकला. या विजयानंतर मोहम्मद रिझवानने सोशल मीडियावर हा विजय गाझामध्ये स्थायिक झालेल्या पॅलेस्टिनी लोकांना समर्पित केला. रिझवानने एक्सवर उघडपणे समर्थन करणारा संदेश लिहिला आहे, जो व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिकेटच्या मैदानावर नमाज अदा करणाऱ्या रिझवानने लिहिले, “हे गाझामधील आमच्या भावा-बहिणींसाठी होते. विजयात योगदान दिल्याबद्दल आनंद झाला. संपूर्ण टीमला आणि विशेषत: अब्दुल्ला शफीक आणि हसन अलीला श्रेय देतो. कारण त्यांच्यामुळे विजय सोप्पा झाला. हैद्राबादच्या लोकांचे अद्भूत आदरातिथ्य आणि पाठिंब्याबद्दल त्यांचे आभारी आहोत.”

नुकतेच हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून खळबळ उडवून दिली होती. त्याच्या सैनिकांनी शेकडो लोकांना ठार केले. यानंतर इस्रायल गाझावर सातत्याने हल्ले करत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी उघडपणे युद्धाची घोषणा केली आहे. या युद्धात अमेरिका, ब्रिटन आणि भारतासह अनेक बड्या देशांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. दुसरीकडे, भारतात विश्वचषक खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाच्या स्टार फलंदाजाने एक्सवर (ट्विटर) पोस्ट केलेल्या या ओळी या खेळाला एक वेगळेच रूप देत असल्याचे दिसत आहे.मोहम्मद रिझवानच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs AFG: इशानला सलामीची आणखी एक संधी, टीम इंडियात मोठा बदल, जाणून घ्या दोन्ही संघांही प्लेइंग-११

पाकिस्तानने श्रीलंकेसमोर ३४५ धावांचे लक्ष्य गाठून इतिहास रचला. पाकिस्ताने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठला केला. या प्रकरणात पाकिस्तानने आयर्लंडचा विक्रम मोडला. आयर्लंडने २०११ मध्ये इंग्लंडविरुद्धचा सामना सात गडी गमावत ३२९ धावा करून जिंकला होता.

रिझवान आणि शफिकचे शतक –

पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफीक यांनी शतकी खेळी खेळली. रिझवानने १२१ चेंडूत १३४ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याने चौकार मारून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. शफीकने ११३ धावांची खेळी केली. सौद शकीलने ३१ धावांचे योगदान दिले. इफ्तिखार अहमद २२ धावा करून नाबाद राहिला. इमाम उल हक १२ धावा करून बाद झाला तर कर्णधार बाबर आझम १० धावा करून बाद झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the victory against sri lanka mohammad rizwan said the victory was dedicated to the brothers and sisters in gaza vbm