Virat Kohli Instagram Story Viral After India’s Defeat: भारतीय संघ पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरला आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर संघाची आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांची खूप निराशा झाली आहे. त्यानंतर विराट कोहलीने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कर्णधार रोहित शर्मानेही पत्रकार परिषदेत सांगितले की, ड्रेसिंग रूममधील प्रत्येकजण निराशा असेल, मला संघातील वातावरण चांगले ठेवण्याची गरज आहे. पाचव्या दिवशी २०९ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज विराट कोहलीची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेचा विषय बनली आहे.
मौन हा महान शक्तीचा स्रोत –
स्टार फलंदाज विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर प्रसिद्ध चीनी तत्वज्ञानी लाओ-त्सू यांचा कोट शेअर केला आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, “मौन हा महान शक्तीचा स्रोत आहे.” साहजिकच या मोठ्या सामन्यातील पराभवानंतर कोहली स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या डावात, विराट कोहलीला स्कॉट बोलंडने स्लिपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद झाला. तो ४९ धावा करून बाद झाला. सामन्याच्या चौथ्या दिवशी कोहलीने चांगली फलंदाजी केली होती आणि ४४ धावांवर नाबाद माघारी परतला होता.
पण पाचव्या दिवशी तो केवळ ५ धावांनी आपली धावसंख्या वाढवू शकला. तसेच एका धावेने त्याचे अर्धशतक हुकले. कोहलीने दुसऱ्या डावात ७८ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ही खेळी केली. याआधी पहिल्या डावातही विराट कोहली काही खास खेळी करता आली नव्हती. तो ३१ चेंडूत १४ धावा काढून बाद झाला होता.
सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४६९ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने प्रत्युत्तरात आपल्या पहिल्या डावात सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ८ बाद २७० धावांवर घोषित केला. यानंतर ऑस्ट्रेलियाने दोन्ही डावाच्या जोरावर भारतीय संघासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात २३४ धावांवर गारद झाला.