वेगवान गोलंदाज दीपक चाहरला आयपीएलच्या महालिलावामध्ये २०२२ च्या पर्वात मिळालेली रक्कम अधिक वाटतेय. मला एवढी जास्त रक्कम नको होती असं चाहर म्हणालाय. इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या लिलावादरम्यान चेन्नईकडून जेव्हा १३ कोटींची बोली लावण्यात आली तेव्हा चाहरला आता लिलाव थांबावा असं वाटतं होतं. आपल्यावर अधिक बोली लावल्याने एक चांगला संघ तयार करण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते असंही चाहर म्हणालाय.
सीएसकेने चाहरला १४ कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं आहे. आयपीएलच्या लिलावामध्ये सर्वाधिक किंमतीला विकत घेण्यात आलेल्या गोलंदाजाच्या यादीमध्ये चाहरचा समावेश झालाय. चाहरने आपण इतर कोणत्याही संघाचा सदस्य बनण्याचा विचारही केला नव्हता असं म्हटलंय. “मला सीएसकेकडूनच खेळायचं होतं. कारण मी पिवळ्या रंगाची जर्सी सोडून इतर कोणत्याही जर्सीमध्ये खेळण्याची कल्पनाही करु शकत नाही,” असं चाहर म्हणालाय.
नक्की पाहा >> Photos: ‘टेनिस बॉल क्रिकेटचा सुपरस्टार’ अगदी शेवटच्या क्षणी आर्यन, सुहानामुळे KKR च्या संघात; पण तो आहे तरी कोण?
पुढे बोलताना चाहरने १३ कोटींनंतर लिलाव थांबवायला हवा होता असं मत व्यक्त केलं. तो म्हणतो, “एका क्षणी मला वाटलं की ही (बोलीमध्ये लावण्यात आलेली रक्कम) फार जास्त आहे. सीएसकेचा खेळाडू असल्याने एक चांगला संघ तयार व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळेच जेव्हा त्यांनी १३ कोटी रुपये माझ्यावर खर्च करण्यासाठी बोली लावली तेव्हा लिलाव थांबावा आणि मी सीएसकेच्या संघाचा भाग व्हावं असं मला वाटत होतं. उरलेल्या पैशांमधून आम्हाला अन्य काही खेळाडू विकत घ्यावे, असं मला वाटलं.”
नक्की वाचा >> IPL 2022 Auction: “…म्हणून आम्ही रैनाला विकत घेतलं नाही”; धोनीच्या CSK ने केला मोठा खुलासा
सध्या भारताच्या मार्यादित षटकांच्या संघाचा सदस्य असणाऱ्या चाहरने २०१८ सालातील एक आठवण सांगितलं. त्याला सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन यांनी, ‘तू कायम पिवळ्या जर्सीमध्येच खेळशील’ असं म्हटलं होतं. त्यानंतर चाहरने कधीच धोनी किंवा संघ व्यवस्थापनाकडे रिटेन करण्यासंदर्भातील मागणी केली नव्हती.
“मी कधीच याबद्दल माही भाई (धोनी) किंवा संघ व्यवस्थापनाशी बोललो नाही. मी २०१८ मध्ये श्रीनिवास सरांना भेटलो होतो तेव्हा त्यांनी मला तू कायम पिवळ्या जर्सीमध्ये खेळशील असं सांगितलं होतं. मी त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि त्यानंतर कधीच रिटेन करण्यासंदर्भातील चर्चा कोणासोबत केली नाही. मला ठाऊक होतं की सीएसके माझ्यासाठी बोली लावणार,” असंही चाहर म्हणाला.