बीसीसीआयच्या निरीक्षकांकडून मैदानाची पाहणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत उपाध्यक्षपद टिकवून ठेवणारे आणि जिल्हा संघटनेवर २००३ पासून मांड ठोकलेले अध्यक्ष धनपाल तथा विनोद शहा यांच्या कार्यकारिणीने तीन वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा नाशिक येथे रणजी सामना मिळवला असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निरीक्षकांनी पाहणी करून तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहेत.

नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर ७ ते १० डिसेंबर या कालावधीत उत्तर प्रदेश विरुद्ध बडोदा हा रणजी सामना होणार आहे. नाशिकमधील हा १४वा रणजी सामना ठरणार आहे. २००५ पासून शहा आणि कंपनीने प्रत्येक वर्षी रणजी सामन्याचे आयोजन करण्यात यश मिळवले. २००६ मध्ये तर एकाच वर्षी दोन रणजी सामने झाले. सामने यशस्वी करण्याचे तंत्र आणि मंत्र चांगलेच आत्मसात झालेले असताना त्यात मागील तीन वर्षांपासून खंड पडला.

गहुंजे येथे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर सामने सुरू झाल्यापासून नाशिकच्या वाटय़ाला सामन्यांचे आयोजन बंद झाले होते. गहुंजे येथील स्टेडियमला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळण्यासाठी त्या ठिकाणी काही प्रथम श्रेणी सामन्यांचे आयोजन करणे आवश्यक होते. आता या स्टेडियमला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाल्यामुळे नाशिकला या हंगामात रणजी सामन्याचे आयोजन करता येणार असून त्याची अधिकृत घोषणा होणे तेवढे बाकी असल्याची माहिती धनपाल शहा यांनी दिली.

बीसीसीआयचे निरीक्षक धीरज परसाना यांनी पांडुरंग साळगावकर यांच्यासह अलीकडेच मैदानाची पाहणी करून जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना काही किरकोळ सूचना केल्या. ड्रेसिंग रूममध्ये इतर आगंतुकांचा प्रवेश टाळण्यासह खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था कुठे राहणार, याविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली. जिल्हा संघटनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी १० रणजी सामन्यांचे आयोजन यशस्वी केलेले असल्याने त्यांना विशेष काही सांगण्याची गरज नसल्याचेही परसाना यांनी नमूद केले. नाशिकमध्ये मागील महिन्यात झालेल्या पावसाचा उपयोग मैदानावरील लॉन, गवत यांच्यासाठी चांगलाच झाला असून याआधीच्या सामन्यांप्रमाणे पुढील सामन्याचे आयोजनही यशस्वी करण्यात येईल, असे जिल्हा संघटनेचे पदाधिकारी समीर रकटे यांनी सांगितले.