भारताचा यशस्वी संघनायक असे बिरूद मिरविणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने आपल्या व्यक्तिमत्वाची आणखी एक अदाकारी पेश केली. प्राणीमात्रांवर असलेले आपले निस्सीम प्रेम सिद्ध करताना भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आता एका श्वानाला दत्तक घेतले आहे.
रांचीतील ‘होप एण्ड अ‍ॅनिमल ट्रस्ट’ संस्थेने सुटका केलेल्या एका श्वानाला धोनीने आपल्या घरी नेले आहे. घरातील नव्या सदस्याबद्दल धोनीने ‘ट्विटर’वर माहिती दिली. इंग्लिशमध्ये तिचे नाव लिआ तर हिंदीत तिचे नाव लिया असल्याची माहिती धोनीने दिली. लियाचे छायाचित्रही धोनीने प्रसिद्ध केले आहे.
या आधी २०११मध्ये धोनीने म्हैसूर अभयारण्यातील अगास्थ्या नावाच्या वाघाला दत्तक घेतले होते. धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून विश्रांतीचा काळ अनुभवत आहे. भारतीय संघाच्या सध्या सुरू असलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात धोनी सहभागी झालेला नाही. विश्रांतीच्या काळात धोनी आपल्या आवडीच्या गोष्टी करून वेळ घालवत आहे. ‘ट्विटर’वर त्याने मोटारबाइक आणि दैनंदिन आयुष्याविषयी माहितीही दिली आहे. धोनीकडे आता जगभरातील वेगवान बाइक्स आहेत, मात्र आपल्या पहिल्यावहिल्या आणि केवळ ४,५०० रुपयांना विकत घेतलेल्या बाइकला सुधारण्याचा धोनीचा मानस आहे.

Story img Loader