Reactions On Social Media After RCB Became WPL Champion 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रविवारी महिला प्रीमियर लीग २०२४ चे विजेतेपद पटकावल्यामुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर या विजयाबद्दल संघ आणि कर्णधार स्मृती मंधानाचे अभिनंदन केले आहे. विराट कोहलीने आरसीबी महिला संघासाठी खास नाव वापरले आहे. त्याचबरोबर ख्रिस गेलपासून वीरेंद्र सेहवागपर्यंत सर्वांनी या फ्रँचायझीचे जेतेपदाचा दुष्काळ संपवल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
सचिन, हरभजन आणि धवन केले अभिनंदन –
आरसीबीच्या विजयानंतर सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग आणि शिखर धवन यांनीही संघाचे अभिनंदन केले आहे. सचिनने लिहिले, ”महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकल्याबद्दल आरसीबी महिला संघाचे अभिनंदन. भारतात खरोखरच महिला क्रिकेट वाढत आहे.”त्याचबरोबर हरभजन सिंगने लिहिले, “आरसीबी महिला संघाने ट्रॉफी जिंकून दाखवली आहे. आता पुरुष संध जेतेपदाची पुनरावृत्ती करू शकतील का? सर्वांच्या नजरा विराट आणि मॅक्सवेलवर असतील.”
किंग कोहली आणि युनिव्हर्सल बॉसने केले अभिनंदन –
विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली असून टीमला ‘सुपरवुमन’ म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी मंधाना आणि टीमच्या इतर सदस्यांशी व्हिडिओ कॉलवर बोलून त्यांचे अभिनंदनही केले. त्याच वेळी, माजी आरसीबी क्रिकेटर ख्रिस गेलने लिहले, “एका उत्कृष्ट हंगामाबद्दल अभिनंदन.”
लक्ष्मण-सेहवाग यांनी केले अभिनंदन –
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ट्विटरवर लिहिले, “डब्ल्यूपीएलचा विजेता बनल्याबद्दल आरसीबीचे खूप अभिनंदन. संपूर्ण चाहत्यांचा पाठिंबा पाहून खूप छान वाटले आणि स्पर्धा अप्रतिम होती.” तसेच, माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागने लिहिले, “महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकल्याबद्दल आरसीबीचे खूप अभिनंदन. या संघाने कठीण परिस्थितीत चांगली कामगिरी केली आणि ते जेतेपद पटकावले.”
आरसीबीच्या चाहत्यांच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओही समोर आला आहे. रात्री उशिरा घराबाहेर पडून चाहते नाचताना दिसले. रॉबिन उथप्पा, इयान बिशप, बद्रीनाथ, दिनेश कार्तिक, मिताली राज, झुलन गोस्वामी, युजवेंद्र चहल आणि ग्लेन मॅक्सवेल यांसारख्या अनेक क्रिकेटपटूंनीही आरसीबी संघाचे अभिनंदन केले आहे.
काय घडलं मॅचमध्ये?
या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रविवारी महिला प्रीमियर लीग २०२४च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ८ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १८.३ षटकात ११३ धावा केल्या. आरसीबीने १९.३ षटकांत दोन गडी गमावून सहज लक्ष्य गाठले. दिल्लीने दमदार सुरुवात करताना पहिल्या विकेट्साठी ६४ धावांची भागीदारी केली होती. यानंतर संपूर्ण संघ ४९ धावांवर गारद झाला.