भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी आजपासून मालिकेत आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ उत्सुक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ०-४ असा दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर मायदेशात इंग्लंडला सलामीच्या सामन्यात भारताने धूळ चारली आणि कसोटीत भारतीय साम्राज्याचा सूर्य पुन्हा तळपणार, असे चित्र दिसू लागले. पण मुंबई कसोटीत इंग्लंडने त्या पराभवाची सव्याज परतफेड केली आणि भारतीय संघासाठी दुसरी कसोटी काळरात्रच ठरली. फिरकी गोलंदाजीला साजेशा खेळपट्टय़ा बनवण्याचा महेंद्रसिंग धोनीचा हट्ट भारताच्या अंगाशी आला आणि खराब फॉर्ममुळे सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा टीकेचा धनी ठरला. त्यामुळे कसोटीत आपली कामगिरी उंचावून चाहत्यांची मने जिंकण्यासाठी तसेच टीकाकारांची तोंडे बंद करण्यासाठी इंग्लंडविरुद्ध बुधवारपासून ईडन गार्डन्सवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात धोनी आणि त्याच्या सहकाऱ्यांना विजयाच्या मशाली पेटवाव्या लागणार आहेत.
मुंबई कसोटीत इंग्लंडने दणदणीत विजय मिळवल्यानंतरही धोनी आपल्या मागणीवर ठाम आहे. त्यामुळे ईडन गार्डन्सची खेळपट्टी बनवणारे क्युरेटर प्रबिर मुखर्जी आणि धोनी यांच्यात मतभेद झाले. मुखर्जी यांनी रजेवर जाण्याची धमकी दिल्यानंतर क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (कॅब) मध्यस्थी करून मुखर्जी यांची मनधरणी केली. या वादाच्या पाश्र्वभूमीवर भारतीय संघाला आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. १९८४-८५पासून मायदेशात भारताने इंग्लंडविरुद्ध एकही मालिका गमावलेली नाही. पण गेल्या वर्षभरात अनेक सामने गमावल्यामुळे भारताची कसोटी क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. भारतीय संघ विजयासाठी जसा उत्सुक आहे, त्याचप्रमाणे फिरकी गोलंदाजीला आपण समर्थपणे तोंड देऊ शकतो आणि भारतभूमीत मालिका जिंकू शकतो, हे दाखवण्यासाठी इंग्लंड संघही उत्सुक आहे.
चेतेश्वर पुजारा वगळता भारताचे अन्य दिग्गज खेळाडू अपयशी ठरले आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या सलामीवीरांचे अपयश आणि सचिन तेंडुलकरचा खालावलेला फॉर्म याचा फटका भारताच्या कामगिरीला बसत आहे. सचिनला १० डावांत फक्त १५३ धावाच करता आल्या आहेत. सचिनने नेटमध्ये कसून सराव केल्यामुळे तो टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देईल, अशी आशा आहे. विराट कोहलीला या मालिकेत चांगली कामगिरी करता आलेली नाही. अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंग पूर्णपणे निष्प्रभ ठरला आहे. अहमदाबाद कसोटीतील विजयात प्रग्यान ओझाने मोलाचा वाटा उचलला असला तरी त्याला रविचंद्रन अश्विनची साथ लाभत नाही. वेगवान गोलंदाज झहीर खान पूर्णपणे तंदुरुस्त नसून त्याला विकेट मिळवण्यातच नव्हे तर चेंडूला रिव्हर्स-स्विंग मिळवण्यातही अपयश आले. हरभजन तापाने बेजार असल्यामुळे भारतीय संघ या कसोटीसाठी दोन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांना खेळवण्याची शक्यता आहे.
दोन कसोटींत दोन शतके झळकावणारा इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक तुफान फॉर्मात असून मुंबई कसोटीत शतक साजरे करणाऱ्या धडाकेबाज फलंदाज केव्हिन पीटरसनलाही सूर गवसला. पहिल्या चेंडूपासूनच फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टय़ांवर इंग्लंडने भारतीय गोलंदाजांचे आव्हान समर्थपणे पेलले, त्यामुळे पाहुण्या संघाचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. स्टीव्हन फिन दुखापतीतून सावरला असून संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.
 प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, प्रग्यान ओझा, हरभजन सिंग, झहीर खान, इशांत शर्मा, मुरली विजय, अशोक दिंडा.
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), निक कॉम्प्टन, जो रूट, जोनाथन ट्रॉट, केव्हिन पीटरसन, इयान बेल, इऑन मॉर्गन, मॅट प्रायर, जॉनी बेअरस्टो, समित पटेल, ग्रॅमी स्वान, मॉन्टी पनेसार, जेम्स अँडरसन, टिम ब्रेस्नन, स्टुअर्ट ब्रॉड, स्टीव्हन फिन, ग्रॅहम ओनियन्स, स्टुअर्ट मीकर, जेम्स ट्रेडवेल.
सामन्याची वेळ : सकाळी ९ वाजल्यापासून,
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट.    

फिरकी गोलंदाजीला साजेशा खेळपट्टय़ा पाहिजेत, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. उपखंडातील सामन्यांमध्ये फिरकीपटूंची भूमिका निर्णायक ठरत असते. फिरकी गोलंदाजी ही भारताचे सामथ्र्य असल्यामुळे आम्हाला अशाच प्रकारच्या खेळपट्टय़ा हव्या आहेत. भारतात अन्य संघांना फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टय़ांवरच खेळता आले पाहिजे. आम्ही मुंबई कसोटी गमावली असली तरी उपखंडातील खेळपट्टय़ांचा फायदा घेता यावा, अशाच खेळपट्टय़ा बनवल्या गेल्या पाहिजेत. ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमध्ये खेळताना ते आपल्या खेळाडूंना साजेशा अशा खेळपट्टय़ा तयार करतात. त्यामुळे भारतात आम्ही तसे का करू नये. पहिल्या डावातील आघाडी भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर हे सलामीवीर अपयशी ठरत असले तरी आम्ही त्यांच्यावर कोणताही दबाव टाकणार नाही.
– महेंद्रसिंग धोनी
भारताचा कर्णधार.

कर्णधारपदाच्या अतिरिक्त जबाबदारीमुळे माझी फलंदाजी बहरत आहे. जबाबदारीने खेळताना माझी कामगिरीही चांगली होत आहे. कर्णधार या नात्याने संघाला चांगली सुरुवात करून देणे महत्त्वाचे असते. गेल्या दोन सामन्यांत माझी कामगिरी चांगली झाली, याचे समाधान वाटते. मोटेरामधील कसोटी गमावल्यानंतर आम्ही जोमाने पुनरागमन केले. मुंबईतील कसोटी जिंकल्यामुळे संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टय़ांवर आम्ही सुरेख कामगिरी केल्याने भारतीय संघाच्या सर्व आव्हानांना सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. या मालिकेत आघाडी घेण्यासाठी आम्हाला मुंबईप्रमाणे कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल. पाटा खेळपट्टय़ांवर निकाल लागणे कठीण असते. पण फिरकी गोलंदाजांना साथ मिळणाऱ्या खेळपट्टय़ांवर निकाल लागण्याची खात्री असते. त्यामुळे दोन्ही संघांना सामना जिंकण्याची संधी मिळेल.
– अ‍ॅलिस्टर कुक
इंग्लंडचा कर्णधार

हरभजनला तिसऱ्या कसोटीसाठी विश्रांती?
कोलकाता : गेल्या काही दिवसांपासून तापाने बेजार असलेला ऑफस्पिनर हरभजन सिंग याला ईडन गार्डन्सवर इंग्लंडविरुद्ध बुधवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात येईल, अशी चर्चा आहे. हरभजनच्या तब्येतीत सुधारणा होत असली तरी त्याने भारतीय संघाच्या सराव शिबिराला जाणे टाळले. त्याऐवजी हॉटेलमध्ये विश्रांती घेणे त्याने पसंत केले. ‘‘हरभजन गेल्या काही दिवसांपासून तापाने त्रस्त आहे. त्याच्या तब्येतीची पाहणी केल्यानंतरच तिसऱ्या कसोटीसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करायचा की नाही, याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल,’’ असे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सरावानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.