*  चांगल्या सलामीनंतर ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला
*  ऑस्ट्रेलियाची ७ बाद २७३ अशी केविलवाणी स्थिती
*  वॉर्नर, कोवन आणि स्मिथची अर्धशतके
*  जडेजाच्या फिरकीची कमाल
पुन्हा एकदा बंगला बांधण्यासाठी पत्ते रचायला सुरुवात केली.. पाया छान जमला.. मनात आशेचे सुंदर चित्र तयार झाले.. पण पुन्हा एकदा वादळ आले आणि पत्त्याचा बंगला क्षणार्धात कोसळला.. हेच चित्र ऑस्ट्रेलियाच्या डावाचे करता येईल. डेव्हिड वॉर्नर आणि ईडी कोवन यांच्या शतकी सलामीनंतर मोठी धावसंख्या रचण्याचे कांगारूंचे स्वप्न साक्षात अवतरले नाही. अखेरच्या सत्रात भारताने चार बळी घेत तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर आपले वर्चस्व दाखवून दिले. खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाची ७ बाद २७३ अशी केविलवाणी स्थिती होती, तर स्टीव्हन स्मिथ आणि मिचेल स्टार्क अनुक्रमे ५८ आणि २० धावांवर खेळत होते.
ईडी कोवन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलियाला १३९ धावांची दमदार सलामी नोंदवून दिली, पण दुसऱ्या सत्रात डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने प्रथम वॉर्नरचा (९ चौकारांसह १४७ चेंडूंत ७१ धावा) अडसर दूर केला आणि मग पुढच्याच चेंडूवर कप्तान मायकेल क्लार्कला भोपळाही फोडू दिला नाही. क्लार्क आपल्या कसोटी कारकीर्दीत दुसऱ्यांदाच तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला आला होता, पण तो या स्थानाला न्याय देऊ शकला नाही. गेली दोन वष्रे त्याने पाचव्या स्थानावर फलंदाजी करीत धावांचा पाऊस पाडला आहे. या मालिकेत जडेजाने पाच डावांपैकी चौथ्यांदा क्लार्कचा बळी मिळविण्याची किमया साधली. दिवसअखेर जडेजाच्या खात्यावर ३ बळी जमा होते. उत्तरार्धात इशांत शर्मानेही दोन बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या मोठी धावसंख्या उभारण्याच्या लक्ष्याला सुरुंग लावले.
वॉर्नर, क्लार्क माघारी परतल्यावरही कोवनने एक बाजू सावरून धरली होती. त्याने २३८ चेंडूंत ८ चौकारांसह ८६ धावा केल्या. परंतु दोन जीवदान मिळाल्यानंतरही तो आपल्या शानदार खेळीचे शतकामध्ये रूपांतर करू शकला नाही. आर. अश्विनने कोवनचा अडसर दूर केला. पहिल्या स्लिपमध्ये विराट कोहलीने त्याचा झेल टिपला. मग इशांत शर्माने ब्रॅड हॅडिन आणि मोझेस हेन्रिक्सला तंबूची वाट दाखवत ऑस्ट्रेलियाची ६ बाद २४४ अशी अवस्था केली. त्यानंतर जडेजाने पीटर सिडलला भोपळाही फोडू दिला नाही.
 पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवरील पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्याने शुक्रवारी सामना सकाळी ९ वाजता सुरू झाला. ऑस्ट्रेलियाने अपेक्षेप्रमाणेच नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सुमारे दोन वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या स्टीव्हन स्मिथने भारतीय फिरकीचा हिमतीने सामना करीत अर्धशतक झळकावले. कोवन बाद झाल्यावर स्मिथनेच जिद्दीने किल्ला लढवला.

क्लार्क ठरतोय जडेजाचा बकरा
मोहाली : फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये नेहमीच द्वंद्व पाहायला मिळते. काही वेळा फलंदाज वरचढ ठरतात, तर काही वेळा हेच फलंदाज गोलंदाजाचा बकरा ठरतात. सध्या सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेमध्ये कर्णधार मायकेल क्लार्क हा डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजाचा बकरा ठरताना दिसत आहे. या मालिकेतील पाच डावांमध्ये चार वेळा जडेजाने क्लार्कला तंबूत धाडण्याची किमया साधली आहे.
याबाबत जडेजाला विचारले असता तो म्हणाला की, ‘‘क्लार्क माझे सावज आहे की नाही मला माहिती नाही, पण जेव्हा मी गोलंदाजीला येतो तेव्हा तो माझ्यासमोर असतो. त्याची विकेट आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण तो एकदा स्थिरस्थावर झाला की मोठी खेळी साकारण्याची कुवत त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे त्याला बाद केल्यानंतर नक्कीच आनंद झाला आहे.’’

दुसऱ्या दिवसअखेर
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १०४ षटकांत ७ बाद २७३
सत्र    षटके    धावा/बळी
पहिले सत्र    ३६    १०९/०
दुसरे सत्र    ३६    ७१/३
तिसरे सत्र     ३२    ९३/४    

धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ईडी कोवन झे. कोहली गो. अश्विन ८६, डेव्हिड वॉर्नर झे. धोनी गो. जडेजा ७१, मायकेल क्लार्क यष्टिचीत धोनी गो. जडेजा ०, फिल ह्युजेस झे. धोनी गो. ओझा २, स्टीव्हन स्मिथ खेळत आहे ५८, ब्रॅड हॅडिन त्रिफळा गो. शर्मा २१, मोझेस हेन्रिक्स त्रिफळा गो. शर्मा ०, पीटर सिडल पायचीत गो. जडेजा ०, मिचेल स्टार्क खेळत आहे २०, अवांतर (बाइज ४, लेगबाइज ८, नोबॉल ३) १५, एकूण १०४ षटकांत ७ बाद २७३
बाद क्रम : १-१३९, २-१३९, ३-१५१, ४-१९८, ५-२४४, ६-२४४, ७-२५१
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ७-०-३८-०, इशांत शर्मा २१-७-४१-२, आर. अश्विन ३३-८-६४-१, प्रग्यान ओझा २१-४-६२-१, रवींद्र जडेजा २२-६-५६-३.

Story img Loader