भारताचा माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकर याने, वन-डे संघात धोनीऐवजी ऋषभ पंतला जागा देण्याची हीच योग्य वेळ असल्याचं म्हटलं आहे. सध्या धोनीला पर्याय शोधण्याची हीच योग्य वेळ आहे, त्यामुळे कसोटी क्रिकेटनंतर वन-डे संघातही पंतला जागा मिळायला हवी असं आगरकर म्हणाला. गेल्या काही दिवसांमध्ये धोनीच्या फलंदाजीवर बऱ्याच प्रमाणात टीका होत होती. महत्वाच्या क्षणी धोनी संथ फलंदाजी करत असल्याची टीका अनेकांनी केली होती. नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकातही धोनीची कामगिरी फारशी चांगली झालेली नाहीये. मात्र क्रिकेट विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर आलेला असताना निवड समिती असा निर्णय घेईल याची शक्यता जरा कमीच दिसते आहे.

आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यात धोनीला विश्रांती देऊन ऋषभ पंतला सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळायला हवी. त्याला वन-डे संघात अजुनही जागा मिळत नाही हे पाहून मला आश्चर्यच वाटतं. यष्टीरक्षणात पंतला अजुनही सुधारणा करण्याची आवश्यकता असली तरीही त्याने आपल्या फलंदाजीच्या कौशल्याने सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली आहे. नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यात पंतने शतक झळकावलं होतं. त्यामुळे धोनीला विश्रांती दिल्यास संघाला काहीही तोटा होणार नाही, EspnCricinfo या संकेत स्थळाशी बोलताना आगरकरने आपलं मत व्यक्त केलं.

अवश्य वाचा – टीम इंडियाचं Appraisal Time, प्रशासकीय समिती कामगिरीचं मुल्यांकन करणार

ऋषभ पंतच्या आक्रमक खेळीचंही अजित आगरकरने कौतुक केलं. आज नाहीतर उद्या ऋषभ पंतला संघात जागा मिळणारचं आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध वन-डे मालिकेत त्याला मधल्या फळीत खेळण्याची संधी देण्यास काहीच हरकत नाहीये. धोनीचं संघात असणारं महत्व प्रत्येक जाणून आहे, त्यामुळे काही सामन्यांसाठी धोनीला विश्रांती देऊन पंतला संधी देण्यास काहीच हरकत नसल्याचं आगरकर म्हणाला.

Story img Loader