सार्वकलीन महान टेनिसपटू कोण याचे उत्तर देणे कोणालाही संकटात टाकणारे आहे. महान खेळाडू आंद्रे आगासीला हा प्रश्न थोडा सोपा करून सांगण्यात आला. रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यापैकी सार्वकालिन महान टेनिसपटू कोण असा पर्याय त्याला देण्यात आला आणि त्याने फेडररऐवजी राफेल नदालची निवड केली. फेडरर-जोकोव्हिच-नदाल आणि मरे अशा सोनेरी युगात नदालने विजीगिषु वृत्तीने खेळ करत जेतेपदांवर नाव कोरले आहे.
रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच आणि अँडी मरे अशा एकापेक्षा एक प्रतिस्पध्र्याचे खडतर आव्हान मोडून काढत नदालने जेतेपदांपर्यत मजल मारली आहे. तांत्रिकदृष्टय़ा नदालच्या नावावर १३ ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत तर फेडररच्या नावावर १७ जेतेपदे आहेत. मात्र तरीही आपली पसंती नदाललाच असेल असे आगासीने स्पष्ट केले. फेडररविरुद्धच्या त्याच्या वर्चस्वपूर्ण कामगिरीची नोंद घेतली असल्याचे आगासीने पुढे सांगितले.