विश्वचषक हॉकी स्पर्धा २०१८
भुवनेश्वर : विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताची गाठ बलाढय़ नेदरलँड्सशी होणार असून या सामन्यात चुकीला कोणताही वाव नाही. आक्रमक हॉकी हीच भारताची खरी ताकद असल्याचे कर्णधीर मनप्रीत सिंग याने नमूद केले. ‘‘ज्या वेळी आम्ही बचावात्मक हॉकी खेळायला जातो, त्या वेळी प्रतिस्पध्र्याना गोल करण्याची अधिक संधी मिळते. त्यामुळे सुरुवातीपासूनच प्रतिस्पध्र्यावर दबाव आणण्यासाठी भारताला आक्रमक हॉकीचे प्रदर्शन करावे लागणार आहे. मिळालेल्या संधीचा फायदा उठवणे उपांत्यपूर्व फेरीत महत्त्वाचे ठरणार आहे. ही खडतर लढत असून जो संघ मिळालेल्या संधीचे सोन्यात रूपांतर करेल, तोच विजयी ठरेल,’’ असेही मनप्रीतने सांगितले.