Josh Hazlewood out of Australia squad due to injury: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत ७ जूनपासून डब्ल्यूटीसीचा फायनल सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातून बाहेर पडला आहे. जोश हेजलवूडच्या जागी वेगवान गोलंदाज मायकल नासेरचा कांगारू संघात समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला बुधवारपासून भारताविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे, पण त्याआधी जोसचे संघातून बाहेर पडणे पॅट कमिन्सच्या संघासाठी चांगले संकेत नाहीत. यापूर्वी, जोस हेझलवूड दुखापतीमुळे आयपीएल २०२३ मध्ये निम्म्याहून अधिक सामने खेळू शकला नव्हता. त्यानंतर त्याने आरसीबीसाठी शेवटचे काही लीग सामने खेळले.
आयसीसीने दिली माहिती –
जोस हेझलवूडला संघातून वगळण्याची घोषणा आयसीसीने आपल्या वेबसाइटवर केली आहे. त्याचवेळी त्याच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या मायकेल नासेरने ऑस्ट्रेलियाकडून दोन कसोटी आणि दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत. जोश हेझलवूड गेल्या काही काळापासून त्याच्या दुखापतीशी झुंजत आहे. यामुळे त्याला यावेळी महत्त्वाच्या सामन्यापूर्वी संघाबाहेर जावे लागले.
आयपीएल २०२३ मधील जोश हेजलवूडची कामगिरी –
जोश हेजलवूडने दुखापतीतून सावरल्यानंतर आयपीएल २०२३ मध्ये फक्त तीन सामने खेळले होते. या तीन सामन्यांत त्याने तीन विकेट्स घेतल्या. या मोसमातील शेवटचा सामना तो मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळला होता. जोशने या सामन्यात ३ षटके टाकली आणि ३२ धावा दिल्या, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. या मोसमात त्याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध १५ धावांत २ गडी बाद केले, तर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याला एक विकेट मिळाली होती.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ –
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, टॉड मर्फी, मायकेल नेसर, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.