आयपीएलच्या पुढच्या हंगामात दोन नव्या संघांचा समावेश झाल्याचं नुकतंच स्पष्ट झालं. त्यानुसार अहमदाबाद संघाची मालकी सीव्हीसी ग्रुपकडे तर लखनऊ संघाची मालकी आरपीएसजी समूहाकडे आली आहे. आरपीएसजी संघानं तब्बल ७ हजार ९० कोटींना लखनऊ संघाला खरेदी केले, तर सीव्हीसी कॅपिटलने ५ हजार ६२५ कोटी रुपयांच्या बोलीसह अहमदाबाद संघावर मालकी मिळवली. मात्र, आता सीव्हीसी ग्रुपची अहमदाबाद संघावरची मालकी धोक्यात आली आहे. बोली लावण्याची प्रक्रिया पूर्ण होताच सीव्हीसी ग्रुपच्या विशिष्ट व्यवहारांवर आक्षेप घेतला जात आहे.
पहिल्या आयपीएल हंगामाचे प्रमुख ललित मोदी यांनी ट्वीट करून यासंदर्भात आपला आक्षेप नोंदवला आहे. “मला वाटतं आता बेटिंग करणाऱ्या कंपन्या देखील आयपीएलमधील संघ विकत घेऊ शकतात. हा नवीन नियम करण्यात आला असावा. लिलाव लावणारी एक कंपनी बेटिंग कंपनीची मालक असल्याचं दिसून येत आहे. आता पुढे काय? बीसीसीआय त्यांचा गृहपाठ करत नाही का? भ्रष्टाचारविरोधी पथकं अशा वेळी काय करतात?” असं ट्वीट ललित मोदी यांनी केलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स ही एक खासगी गुंतवणूक कंपनी आहे. त्यांनी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीचा काही भाग हा क्रिकेटवर बेटिंग करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवला आहे. टिपिको (Tipico) या जर्मनीतल्या गॅम्बलिंग कंपनीमध्ये देखील त्यांनी मोठ्या प्रमणावर गुंतवणूक केल्याची माहिती मिळते आहे.
दरम्यान, सीव्हीसी ग्रुपने लिलाव प्रक्रियेच्या वेळी ही बाब सांगितली नसल्याची देखील माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय सीव्हीसी ग्रुपची बोली नियमांवर बोट ठेवून नाकारू शकते. असे झाल्यास बोली लावणाऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीकडे अहमदाबादच्या आयपीएल टीमची मालकी जाऊ शकते. ही दुसरी कंपनी अर्थात अदानी ग्रुप समूह आहे!
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : विक्रमी बोली! ; दोन नव्या संघांचा ‘आयपीएल’मध्ये प्रवेश
लिलाव प्रक्रियेमध्ये सीव्हीसी कॅपिटलने ५ हजा ६२५ कोटींची बोली लावून अहमदाबादचा संघ खरेदी केला. अदानी ग्रुपनं या संघासाठी ५ हजार १०० कोटींची बोली लावली होती. त्यामुळे ५२५ कोटींनी अदानी ग्रुप हा लिलाव जिंकू शकले नाहीत. मात्र, आता जर सीव्हीसी ग्रुपला बीसीसीआयनं नाकारलं, तर या संघाची मालकी अदानी ग्रुपकडे जाऊ शकते!