महाकबड्डी लीगच्या तिसऱ्या दिवशी अंकित जगतापने सुवर्णचढाईत दोन गुणांची कमाई करत महिलामध्ये नगर चॅलेंजर्सला ठाणे टायगर्सवर रोमहर्षक विजय मिळवून दिला. तर पुरुषांमध्ये मुंबई डेव्हिल्स संघाने नगर चॅलेंजर्सवर ४१-३३ अशी आरामात मात केली.
भारतीय क्रीडा मंदिरात सुरू असलेल्या महाकबड्डी लीगला रविवारी कबड्डीरसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला आणि त्यांना तितक्याच चित्तथरारक लढतीचा आनंद लुटता आला. महिलांमध्ये किशोरी शिंदेच्या नेतृत्वाखालील नगर आणि स्नेहल शिंदेच्या नेतृत्वाखालील ठाणे या दोन बहिणींमधील लढतीने अखेपर्यंत उत्कंठा निर्माण केली. मध्यंतराला ठाण्याने २५-२३ अशी माफक आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी एकमेकांवर लोण चढवून ही चुरस आणखी वाढवली. कोमल देवकर आणि स्नेहल शिंदे यांनी बोनस गुण घेत अखेरच्या मिनिटाची रंगत वाढवली. मग कोमलची अखेरची चढाई निष्फळ ठरली आणि सामना ४०-४० असा बरोबरीत सुटला. परंतु अंकिताने सुवर्णचढाईत नगरला विजय मिळवून दिला. सामनावीर कोमल देवकर आणि अंकित जगतापने नगरकडून दमदार चढाया केल्या, तर क्षितिजा हिरवेने ७ पकडी केल्या. ठाण्याकडून स्नेहलने चढायांचे १२ आणि आम्रपाली गलांडेने ११ गुण मिळवले.
पुरुषांमध्ये मुंबईने १७व्या मिनिटाला नगरवर पहिला लोण चढवला, परंतु पहिल्या सत्रात मात्र १८-१८ अशी बरोबरी राहिली. दुसऱ्या सत्रात नवव्या मिनिटाला मुंबईने सांघिक क्षेत्ररक्षणाची उत्तम अदाकारी पेश करीत दुसरा लोण चढवला आणि मग सहजगत्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबईकडून अजिंक्य कापरेने चढायांमध्ये १४ गुणांची कमाई करीत सामनावीर किताबावर नाव कोरले. त्याला उत्तम साथ देणाऱ्या उमेश म्हात्रेने चढाईत ६ गुण मिळवले. नगरकडून सचिन पाष्टेने १२ गुण मिळवत पराभव टाळण्यासाठी झुंजार प्रयत्न केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा