भारतीय बॉक्सर्सवरील बंदी उठविल्यानंतर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) अखिल भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या (आयएबीएफ) घटनादुरुस्तीस मान्यता दिली आहे. आयएबीएफचे चिटणीस राजेश भंडारी यांनी ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या (आयओए) निवडणुकीच्या वेळी झालेल्या गोंधळाचे कारण पुढे करीत आयओएवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर एआयबीएने आयएबीएफवर बंदी घातली होती व घटना दुरुस्ती करण्याची सूचना दिली होती.
या संदर्भात भंडारी म्हणाले, आम्ही घटनेतील जागतिक हौशी हा शब्द वगळला असून व्यावसायिक बॉक्सिंगचा त्यामध्ये समावेश केला आहे. त्याचबरोबर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार वय व कालावधी मर्यादेच्या अटींचाही समावेश केला आहे. त्यामुळे एकाचवेळी जागतिक संघटना व केंद्रीय क्रीडा मंत्रालय या दोघांचेही आम्ही समाधान केले आहे.
भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या निवडणुकीबाबत काही तक्रारी आल्यामुळे पुन्हा निवडणुका घेण्याचे आदेश क्रीडा मंत्रालयाने दिले होते. याबाबत भंडारी म्हणाले, मंत्रालयाने जे काही आक्षेप घेतले होते, त्याची आम्ही पूर्तता केली आहे. त्यामुळे पुन्हा निवडणुका घेण्याची आवश्यकता आम्हाला वाटत नाही. क्रीडा मंत्रालयास अजूनही काही शंका असतील तर त्याचे निरसन करण्याची आमची तयारी आहे. जर आम्ही काही चुकीच्या पद्धतीने निवडणुका घेतल्या असतील, तर त्या पुन्हा घेण्यास आम्ही केव्हाही तयार आहोत.  
घटनादुरुस्ती करताना आयएबीएफने चेअरमन पद काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हे पद सध्या संघटनेचे माजी अध्यक्ष अभयसिंह चौताला यांच्याकडे आहे.
आता क्रीडामंत्रालयाने आमच्यावरील बंदी मागे घ्यावी. आम्ही क्रीडा खात्याच्या नियमावलीची पूर्तता केली आहे. त्यांनी सुचविलेले बदलही केले आहेत. क्रीडा मंत्रालयातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेनुसार सर्व गोष्टींची पूर्तता आम्ही केली आहे. त्यामुळे त्यांनी आता आम्हास पुन्हा संलग्नता द्यावी असेही भंडारी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा