बॉक्सिंगमध्ये आशियाई व ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट करण्याची क्षमता असलेले अनेक खेळाडू आपल्या देशात आहेत, मात्र संघटनात्मक स्तरावर असलेले मतभेदच मोठा अडथळा आहे, असे मत ऑलिम्पिकपटू मनोज पिंगळे यांनी व्यक्त केले आहे.
१९८८मध्ये सेऊल येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पिंगळे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतही भाग घेतला आहे. राष्ट्रीय स्तरावरील निवड समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. पुण्यात ते बॉक्सिंग अकादमीद्वारे प्रशिक्षणाचे कार्य करीत असून तेथे बारामती, अहमदनगर, नारायणगाव आदी ठिकाणचेही खेळाडू सरावासाठी येतात. आगामी आशियाई स्पर्धेबाबत त्यांच्याशी केलेली खास बातचीत-
*आशियाई स्पर्धेत भारताला पदकाच्या किती संधी आहेत ?
पुरुष गटात देवेंद्र सिंग (लाइटवेट), शिव थापा (बँटमवेट), मनोजकुमार (लाइट वेल्टरवेट) हे खेळाडू हमखास पदक आणतील अशी मला खात्री आहे. अन्य खेळाडूंना पदकासाठी खूप झगडावे लागणार आहे. महिलांमध्ये मेरी कोम ही भारताची आशास्थान आहे. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तिची निवड होऊ शकली नव्हती. त्याची कसर ती येथे भरून काढेल.  त्याचप्रमाणे लैश्राम सरिता देवी व पूजा राणी यांच्याकडे चांगले नैपुण्य आहे, मात्र त्यांना पदकासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
*राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीच्या तुलनेत आशियाई स्तरावर किती आव्हान असणार
आहे ?
राष्ट्रकुल स्पर्धेपेक्षाही आशियाई स्पर्धेत अधिक आव्हान असणार आहे. भारतीय खेळाडूंची प्रामुख्याने कझाकिस्तान, चीन, उजबेकिस्तान, दक्षिण कोरिया आदी देशांच्या खेळाडूंच्या तुलनेत खरी कसोटीच ठरणार आहे. १९८६मध्ये सेऊल येथील आशियाई स्पर्धेत यजमान कोरियाने खूपच तयारी केली होती. त्यावेळी त्यांच्या खेळाडूंनी सर्वच्या सर्व १२ गटांत सुवर्णपदक घेत विक्रम केला होता.
*राष्ट्रीय स्तरावर संघटनात्मक मतभेदांचा खेळाडूंवर काय परिणाम होण्याची शक्यता आहे?
संघटनात्मक मतभेदांमुळे भारतीय खेळाडूंना अपेक्षेइतकी आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळू शकली नाही. परदेशात सरावासाठी फारसे जाता आलेले नाही. त्यामुळे जी मानसिक तयारी होण्याची गरज असते, तेवढी तयारी त्यांची झालेली नाही. सुदैवाने आता आपल्या खेळाडूंना भारतीय ध्वजाखाली प्रतिनिधित्व  करण्याची संधी मिळणार आहे. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. गेले अनेक वर्षे क्युबाचे इग्लिशियस फर्नाडेझ व भारताचे ज्येष्ठ खेळाडू गुरुबक्ष सिंग हे भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन करीत आहेत. या दोघांनाही भारताच्या प्रत्येक खेळाडूची बारकाईने माहिती आहे. त्यामुळे खेळाडूंना अतिशय चांगल्या रीतीने ते मार्गदर्शन करीत असतात. त्याचा फायदा भारतीय खेळाडूंना मिळू शकेल.
*बॉक्सिंगबाबत आपल्या देशात सकारात्मक बदल झाले आहेत काय?
होय, विजेंदर सिंग व मेरी कोम यांनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविल्यानंतर आपल्या पाल्यांना केवळ आत्मसंरक्षणासाठी नव्हे तर करिअर म्हणून या खेळात टाकण्याचा कल पालकांमध्ये दिसून येत आहे. अलीकडेच मेरी कोम हिच्यावरील चित्रपटामुळेही या खेळात सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे.
*या खेळात प्रगती होण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत?
आपल्या देशात विशेषत: तळागाळापर्यंत या खेळासाठी उपलब्ध असलेल्या क्रीडा नैपुण्याचा विकास करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता चांगल्या दर्जाचे प्रशिक्षकांची गरज आहे. तसेच संघटकांनी आपले मतभेद बाजूला ठेवीत खेळाडूंच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज आहे.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा