आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) भारतामधील बॉक्सिंगचा कारभार सांभाळण्यासाठी महासंघाचे भारतीय सदस्य किशन नरसी यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या अस्थायी समितीकडे सोपविली आहेत.
या समितीत बरखास्त केलेल्या बॉक्सिंग इंडिया या संघटनेचे सरचिटणीस जय कवळी, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे सरसंचालक इंजेती श्रीनिवास व माजी आंतरराष्ट्रीय टेनिसपटू मनीषा मल्होत्रा यांचा समावेश आहे. समितीमधील पाचवे सदस्य हे राष्ट्रीय प्रशिक्षक असणार आहेत. या प्रशिक्षकांची लवकरच नियुक्ती केली जाणार आहे.
एआयबीएचे अध्यक्ष चिंगकुओ वुई यांनी नरसी यांना एका पत्राद्वारे ही माहिती पाठविली आहे. वुई यांनी म्हटले आहे, अस्थायी समितीचे अध्यक्ष या नात्याने नरसी यांनी सर्व सदस्यांना ही माहिती पाठवावी. तसेच समितीचे सल्लागार म्हणून रणधीरसिंग यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनाही ही माहिती दिली जावी.
बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोदिया यांच्याविरुद्धचा अविश्वासाचा ठराव ५५-२ अशा मतांनी मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे एआयबीएने बॉक्सिंग इंडिया बरखास्त केली होती.
बॉक्सिंग इंडियाचे सरचिटणीस कवळी यांनी या मतदानाच्या अगोदरच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. गतवर्षी सप्टेंबरमध्ये बॉक्सिंग इंडियाची मान्यता काढून घेण्यात आली होती मात्र सुरुवातीपासूनच भारतीय ऑलिम्पिक महासंघाने त्यांना मान्यता देण्याचे टाळले होते.
अस्थायी समितीबाबत बॉक्सिंग इंडिया अनभिज्ञ
एआयबीएने जरी अस्थायी समिती नियुक्त केली असली तरी बॉक्सिंग इंडियाचे माजी पदाधिकारी तसेच विविध राज्यांच्या संघटनांनी आपल्याला याबाबत काहीच माहिती दिली नसल्याचे सांगितले. बॉक्सिंग इंडियाच्या काही पदाधिकाऱ्यांनी रीतसर निवडणुका घेण्याची तयारीदेखील सुरू केली होती. याबाबत लवकरच ते एआयबीएकडे पत्रव्यवहारदेखील करणार होते.
बॉक्सिंग इंडियाचे प्रभारी अध्यक्ष मिरेन पॉल म्हणाले, एआयबीएने अस्थायी समितीच्या नियुक्तीबाबत अगोदर आपल्याकडे पत्रव्यवहार करायला पाहिजे होता असे सांगितले. त्यांनी पुढे सांगितले, याबाबत आमच्याकडे अद्याप काहीही माहिती आलेली नाही.
जेव्हा आमच्याकडे माहिती येईल तेव्हा आम्ही याबाबत विचार करू. एआयबीए ही आमच्या खेळातील सर्वोच्च संस्था आहे व त्यांचे आदेश पालन करणे हे आमचे कर्तव्यच आहे. विविध गटांच्या राष्ट्रीय स्पर्धा आम्ही ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्याचेही ठरविले होते.
२०१२ पासून या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या नाहीत. अनेक खेळाडू कनिष्ठ गटातून वरिष्ठ गटात पोहोचले आहेत. त्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी दिली पाहिजे. त्यामुळेच आम्ही या स्पर्धांचे नियोजन केले होते.