आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक नाकारणाऱ्या बॉक्सिंगपटू सरिता देवीला आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेण्यास एक वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. अल्पकाळासाठीच असलेल्या बंदीमुळे तिची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात येण्याचा धोका टळला आहे.
दक्षिण कोरियात आशियाई स्पर्धेत झालेल्या पक्षपाती निर्णयाच्या निषेधार्थ तिने कांस्यपदक स्वीकारण्यास नकार दिला होता. तिच्या या वर्तनाबद्दल आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने (एआयबीए) सरिताला एक हजार स्वीस फ्रँक्स (६६ हजार रुपये) दंड ठोठावला आहे. तसेच १ ऑक्टोबर २०१४ ते १ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत तिला स्पर्धात्मक बॉक्सिंगमध्ये भाग घेण्यास मनाई करण्यात आली आहे. बंदीची कारवाई मागे घ्यावी, यासाठी सरिताने एआयबीएला विनंती केली होती, मात्र तिची विनंती फेटाळण्यात आली.
२०१६मध्ये होणाऱ्या महिलांच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये तिला भाग घेता येईल, असे बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोडिया यांनी सांगितले. सरिता ही सध्या उजव्या मनगटाच्या दुखापतीवर उपचार घेत आहे.
सरिताला बेशिस्त वर्तनापासून न रोखल्याबद्दल राष्ट्रीय प्रशिक्षक गुरुबक्षसिंग संधू यांनाही दोषी ठरविण्यात आले होते व त्यांच्यावरही तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. एआयबीएने त्यांना निदरेष ठरवले आहे. मात्र भारताचे परदेशी प्रशिक्षक ब्लास इग्लिशियास यांच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. तसेच त्यांना दोन हजार स्वीस फ्रँक्सचा दंड ठोठावण्यात आला आहे.
जजोडिया म्हणाले, ‘‘क्यूबाच्या या प्रशिक्षकांवरील कारवाई मागे घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार होतो, मात्र आंतरराष्ट्रीय नियमांबाबत त्यांना जास्त माहिती आहे. त्यांनी गैरवर्तनापासून सरिताला रोखायला पाहिजे होते.’’
सरिताचे वैयक्तिक प्रशिक्षक लेनिन मेतेई यांच्यावर एक वर्षांसाठी तर तिचे पती थोईबा सिंग यांना दोन वर्षांसाठी मनाई करण्यात आली आहे. रिंग प्रशिक्षक सागरमय धयाल यांना निदरेष ठरवले आहे.
‘‘सरिताला ठोठावण्यात आलेला दंड बॉक्सिंग इंडियातर्फे भरला जाईल. सरिताकडे नैपुण्य आहे. तिच्यावरील कारवाई शिथिल करावी यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. वर्षांच्या बंदीवर तिची सुटका झाली आहे. तिची कारकीर्द वाचली आहे हीच समाधानाची गोष्ट आहे,’’ असे जजोडिया म्हणाले.
एआयबीएचे अध्यक्ष चिंग कुओ वुओ यांनी सरितावर तहहयात बंदीची कारवाई केली जाईल अशी शक्यता वर्तविली होती. मात्र अल्पकाळाच्या बंदीवर तिची कशी सुटका झाली असे विचारले असता जजोडिया म्हणाले, ‘‘वुओ यांचे ते मत वैयक्तिक होते व असे मत व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार आहे. मात्र आम्ही सरिताची बाजू योग्य रीतीने मांडली. झालेल्या घटनेबद्दल तिने जाहीर माफी मागितली आहे. त्यामुळे तिला माफ करावे किंवा कमीत कमी शिक्षा करावी अशी आम्ही शिफारस केली होती.’’
एआयबीएच्या शिस्तभंग समितीने बॉक्सिंग इंडियाला जबाबदारीचे भान न ठेवल्याबद्दल दोषी ठरवले आहे. मात्र बॉक्सिंग पथकाची नियुक्ती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अस्थायी समितीने केल्यामुळे बॉक्सिंग इंडियावर कारवाई करण्यात आलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अल्पकाळाच्या बंदीमुळे माझी कारकीर्द वाचली आहे. एक ऑक्टोबर २०१५नंतर ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धामध्ये मला भाग घेता येणार आहे. तोपर्यंत मी खूप मेहनत घेणार आहे व शारीरिक तंदुरुस्तीवर भर देणार आहे. माझ्यावरील कारवाई कमी व्हावी यासाठी बॉक्सिंग इंडिया व अन्य संघटकांनी जे काही प्रयत्न केले, त्यांचे मी मनोमन आभार मानते.
-सरिता देवी

सरिताची कारकीर्द वाचण्यासाठीच पत्रप्रपंच
मुंबई : सरिता देवीची कारकीर्द वाचवणे, हाच आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनला पत्र लिहिण्याचा प्रमुख उद्देश होता, असे भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सांगितले. मुंबईत दहा कलावंतांनी साकारलेल्या सचिनवरील एका कलाप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी सचिन म्हणाला की, सरिताने केलेल्या छोटय़ाशा चुकीमुळे तिची कारकीर्द संपुष्टात येऊ नये, हाच आमचा प्रयत्न होता.
सरितावरील कारवाई मागे घ्यावी -सोनोवल
नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्री सर्बानंद सोनोवल यांनी सरितावरील एक वर्षांची कारवाई रद्द करावी, अशी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनला विनंती केली आहे. ते म्हणाले, ‘‘मी स्वत: एआयबीएच्या अध्यक्षांकडे पत्र लिहून सरितावरील बंदी मागे घ्यावी अशी विनंती केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aiba slaps one year ban on sarita devi for refusing asiad medal