Aiden Markram SRH Captain: जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट प्रीमियर लीग आयपीएलचा १६वा हंगाम एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत सुरू होणार आहे. त्यासाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादने आपल्या नव्या कर्णधाराच्या नावाची केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एडन मार्कराम संघाचे धुरा सांभाळणार आहे. तो सुरुवातीपासूनच कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर होता आणि आता त्याची अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली आहे.
एडन मार्करामकडे कर्णधारपदाचा मोठा अनुभव –
दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू एडन मार्कराम सध्या धोकादायक फॉर्ममध्ये आहे आणि त्याला कर्णधारपदाचा अनुभवही आहे. त्याने अलीकडेच दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमध्ये सनरायझर्स केपटाऊनला चॅम्पियन बनवले आहे. SA20 मध्ये एडननेही आपली अष्टपैलू कामगिरी दाखवली. त्याने संघासाठी ३३६ धावा केल्या आणि ११ बळीही घेतले. यादरम्यान त्याने उपांत्य फेरीतही शतक झळकावले.
मार्करामने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व केले आहे. दक्षिण आफ्रिकेला विश्वचषक जिंकून देणारा तो एकमेव कर्णधार आहे. मार्करामच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेने २०१४ मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकला होता.
एडन मार्करामची आयपीएल कारकिर्द –
एडन मार्करामच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे तर तो आयपीएलमध्ये दोन सीझन खेळला आहे. आयपीएल २०२१ मध्ये त्याने ६ सामन्यात १४६ धावा केल्या. त्याने आयपीएल २०२२ मध्ये चांगली कामगिरी केली आणि १४ सामन्यांमध्ये ३८१ धावा केल्या. यादरम्यान त्याने तीन अर्धशतकेही झळकावली. आयपीएलमध्ये त्याने २० सामन्यांमध्ये १३४ च्या स्ट्राईक रेटने ५२७ धावा केल्या आहेत.
सनरायझर्स हैदराबादचा संघ: हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन, एडन मार्कराम, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव, नितीश कुमार रेड्डी, अनमोलप्रीत सिंग, समर्थ व्यास, सनवीर सिंग, मयंक डागर, विव्रत शर्मा, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, वा. सुंदर, मारन मलिक, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, अकील हुसेन, आदिल रशीद, मयंक मार्कंडे.