वृत्तसंस्था, नवी दिल्ली
कर्णधार ऋषभ पंतला गवसलेल्या सुरामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या गेल्या चारपैकी तीन सामन्यांत विजय नोंदवलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला रोखण्याचे आज, शनिवारी मुंबई इंडियन्ससमोर आव्हान असेल. ‘प्ले-ऑफ’ प्रवेशाच्या आशा कायम राखण्यासाठी मुंबईला आता कामगिरी उंचवावी लागणार आहे. त्या दृष्टीने आज दुपारच्या सत्रात होणाऱ्या सामन्यातील विजय मुंबईसाठी महत्त्वाचा ठरू शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाला आतापर्यंत आठपैकी केवळ तीन सामने जिंकता आले आहेत. गेल्या तीन सामन्यांत पराभव, विजय, पराभव अशी मुंबईची कामगिरी आहे. परंतु मुंबईचे अजूनही सहा सामने शिल्लक असल्याने ‘प्ले-ऑफ’ गाठण्याची त्यांना संधी कायम आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी कामगिरीत सातत्य राखणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मुंबईला गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नऊ गडी राखून धूळ चारली होती. त्यामुळे आता खेळाडूंना आत्मविश्वास देण्याचे काम कर्णधार हार्दिकला करावे लागणार आहे.

हेही वाचा >>>PBKS VS KKR: पंजाबने ‘करुन दाखवला’ विक्रमी पाठलाग; केकेआरविरुद्ध २६२चं लक्ष्य केलं पार

दुसरीकडे, दिल्लीच्या संघाला आणि कर्णधार पंतला आता सूर गवसला आहे. सुरुवातीच्या पाचपैकी चार सामन्यांत पराभव पत्करणाऱ्या दिल्लीने गेल्या चारपैकी तीन सामन्यांत विजय नोंदवले आहेत. दिल्लीने गेल्या सामन्यात हार्दिक पंडय़ाचा माजी संघ गुजरात टायटन्सला पराभूत केले होते. या सामन्यात पंतने ४३ चेंडूंत नाबाद ८८ धावांची खेळी करताना आपण आता पूर्णपणे लयीत असल्याचा दाखला दिला होता.

मोठी धावसंख्या अपेक्षित

दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर यंदाच्या हंगामात दोन सामने झाले आहेत. पहिल्या सामन्यात दिल्लीविरुद्ध सनरायजर्स हैदराबादने तब्बल २६६ धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर गेल्या सामन्यात दिल्लीने २२४ धावांची मजल मारल्यानंतर गुजरातने २२० धावा केल्या होत्या. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यातही दोन्ही संघांकडून मोठी धावसंख्या अपेक्षित आहे. या सामन्यात दोन्ही संघांच्या गोलंदाजांचा कस लागणार आहे. दिल्लीकडे चायनामन कुलदीप यादव, डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांसारखे चांगले गोलंदाज आहेत. अक्षर आणि कुलदीप यांनी यंदाच्या हंगामात षटकामागे आठहून कमी धावा दिल्या आहेत. त्यामुळे मधल्या षटकांत या दोघांवरच मुंबईच्या फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी असेल.

कर्णधार हार्दिकच्या कामगिरीवरच लक्ष

मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक सामन्याप्रमाणे या सामन्यातही कर्णधार हार्दिक पंडय़ाच्या कामगिरीवरच सर्वाचे लक्ष असेल. यंदाच्या हंगामात हार्दिकने कर्णधार आणि अष्टपैलू या दोनही भूमिकांमध्ये निराशा केली आहे. फलंदाज म्हणून आठ सामन्यांत त्याला केवळ २१.५७च्या सरासरीने १५१ धावाच करता आल्या आहेत. गोलंदाजीत त्याने केवळ १७ षटके टाकली असून चार गडी बाद केले आहेत. त्यातच कर्णधार म्हणूनही त्याच्याकडून बऱ्याच चुका होत आहेत. त्यामुळे आता हार्दिकवरील दडपण वाढत चालले आहे. केवळ हार्दिक नाही, तर मुंबईच्या सर्वच खेळाडूंनी आपली कामगिरी उंचावणे गरजेचे आहे. कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी काही चांगल्या खेळी केल्या आहेत. परंतु त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराने भेदक मारा करताना आठ सामन्यांत १३ गडी बाद केले आहेत. त्याला अन्य गोलंदाजांची साथ गरजेची आहे.

’ वेळ : दु. ३.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा अ‍ॅप

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aim to raise performance mi vs dc today match ipl 2024 sport news amy
Show comments