भिवंडी येथील अरिहंत कंपाऊंड, पुर्णे येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया, महिंद्रा, महाराष्ट्र पोलीस व शुभम एंटरप्रायझेस या संघांनी उपांत्य फेरीत मजल मारली आहे.
शुभम एंटरप्रायझेसने ठाणे पोलिसांच्या बलाढय़ संघाला २५-१९ असा पराभवाचा धक्का दिला. आशिष कांबळे, युवराज चौगुले यांच्या चढाया तसेच स्वप्निल पाटील, मिलिंद पाटील यांच्या भक्कम पकडींमुळे शुभमने सुरुवातीपासूनच आघाडी मिळवली होती. एअर इंडियाने हेमंत डेकोरेटर्सचा ३१-१७ असा सहज पाडाव केला. राहुल चौधरी, सचिन पाटील यांच्या झंझावाती चढाया आणि दीपक झंझोटने पकडीत दिलेली सुरेख साथ यामुळे एअर इंडियाने मध्यंतराला १६-७ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेत विजय मिळवला.
नीलेश साळुंखे, ओमकार जाधव, सचिन शिंगाडे आणि अमित पाटील यांच्या खेळामुळे महिंद्राने मुंबई पोलिसांचा ४०-१२ असा धुव्वा उडवला. महाराष्ट्र पोलीस संघाने आरसीएफचा प्रतिकार ३३-१८ असा मोडून काढला. आरसीएफकडून अमित पाटील, महेंद्र राजपूत आणि बाजीराव होडगे यांनी चांगला खेळ केला.

Story img Loader