रणजित राणे सामाजिक आणि क्रीडा मंडळतर्फे आयोजित प्रभाकर राणे स्मृतिचषक कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात एअर इंडियाने जेतेपदावर नाव कोरले. महाराष्ट्र पोलीस संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
अंतिम सामन्यात एअर इंडियाने महाराष्ट्रावर १३-६ असा सहज विजय मिळवला. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांमध्ये ३-३ अशी बरोबरी होती, मात्र उत्तरार्धात एअर-इंडिया संघाने निर्विवाद आघाडी घेत विजय साकारला. एअर-इंडियातर्फे गौरव शेट्टी आणि गोकुळ शितोळे यांनी उत्कृष्ट चढाया केल्या. त्यांना प्रशांत चव्हाणच्या अष्टपैलू खेळाची साथ मिळाली.
पुरुष गटात एअर इंडियाच्या प्रशांत चव्हाणची सवरेत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली. उत्कृष्ट चढाईपटू म्हणून एअर-इंडियाच्या गौरव शेट्टीची तर महाराष्ट्र पोलीस संघाच्या देवेश कदमने उत्कृष्ट पकडीचा पुरस्कार पटकावला. महिलांमध्ये दीपिका जोसेफला सवरेत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट चढाईपटू म्हणून राजमाता जिजाऊ संघाच्या स्नेहल शिंदेची निवड झाली. सुवर्णयुगच्या रेणुका दाबकेची उत्कृष्ट पकडपटू म्हणून निवड झाली.

Story img Loader