आपल्या अनोख्या शैलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजांना जाळ्यात पकडणाऱ्या श्रीलंकन फिरकीपटू अजंथा मेंडीसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. ३४ वर्षीय मेंडीस २०१५ साली श्रीलंकेकडून अखेरचा सामना खेळला होता. यानंतर त्याला संघात जागा मिळालीच नाही. अखेरीस सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून मेंडीसने निवृत्ती स्विकारणं पसंत केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘कॅरम बॉल’ हा जादुई चेंडू टाकण्याचं श्रेय मेंडीसला जातं.
२००८ साली आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात १३ धावांत घेतलेले ६ बळी ही त्याची सर्वात लक्षात राहणारी खेळी ठरली. मेंडीसने भारताविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण करत, ३ कसोटी सामन्यांमध्ये २८ बळी घेत भारताला चांगलच अडचणीत आणलं होतं. याचसोबत टी-२० क्रिकेटमध्ये दोनवेळा सहा बळी घेणारा मेंडीस हा एकमेव गोलंदाज आहे. आपल्या कारकिर्दीत मेंडीसने श्रीलंकेचं १९ कसोटी, ८७ वन-डे आणि ३९ टी-२० सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मेंडीसच्या नावावर २८८ बळी जमा आहेत.